Kualoa Ranch: हिरवीकंच पर्वतराजी, पायथ्याशी असलेल्या दरीत (कावा खोरे) तितकेच हिरवे मैलोन-मैल पसरलेले कुरण, त्यावर बिनधास्तपणे चरणाऱी धष्टपुष्ट गाई-वासरं, मधूनच खळखळणारे झरे, खडबडीत पायवाटा एकीककडे, तर तितकेच काहीसे रूंद असलेले कच्चे रस्ते, त्यावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या खुल्या बसेस, सर्वत्र पसरलेलं दाट जंगल, डोंगरांच्या माथ्यावर तरंगणारे काळसर ढग, जंगलातून भ्रमंती करताना झाडाझुडपांच्या आडोशाला लपलेली, पण मधूनच डोकावणारी सिमेन्ट कॉंक्रीटची बंकर्स, लाखो वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या महाकाय पण नामशेष झालेल्या प्राण्यांचे दोन तीन पुरूष उंच हाडांचे कृत्रिम सांगाडे, हत्तींच्या पंधरा ते वीसपट पायांच्या आकारांच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे, मधूनच दिसणारी फुरफुरणाऱ्या तजेलदार घोड्यांची पागा व नजर जाईल तेथवर पसरलेले कुरण, हे विस्मयकारी जग आहे जगप्रसिद्ध व काहीशा गूढ असलेल्या कुआलोआ रँचचे. `मोस्ट मॅजिकल प्लेस ऑन अर्थ’ असं तिचं वर्णन करतात. `ज्युरॅसिक व्हॅली’ या नावानेही रॅंच ओळखली जाते.