ऊन चढायला सुरुवात झाली आहे. या दिवसांत भटकंती कस काढते. हवेत उष्मा वाढत जाईल, पण तुम्ही भर उन्हात चांदण्यांचा आणि नक्षत्रांचा अनुभव कधी घेतलाय? आज घेऊ या मग... आजिवली गावातली देवराई. पवना धरणाच्या कुशीत असलेलं हे एक छोटंसं गाव आणि तिथं देवतांच्या नावानं राखलेलं वन, राई म्हणजेच देवराई.
पुण्याहून अंदाजे ५० किलोमीटरचा मार्ग. पायथ्याशी गावात गाडी लावली की, चढत्या उन्हात रस्ता विचारून चालायला सुरुवात करायची. अंदाजे अर्ध्या तासाचीच चाल. चढत्या श्वासानं थोडीशी धाप लागते. सरळ जंगलाच्या जमिनीवर बसून श्वास जुळवायचा. धुळाटीच्या वाटेवरची जडशी धूळ कपड्यांवर विसावते. केसांतून थंडगार घामाची धार ओघळताना जाणवते. पानगळ झालेली, रानांनी तुरळक पळस पेटलेले, उन्हाच्या झळांनी रानाचं ते चित्र हलताना भासतं.
गर्द राईत शिरताना अचानक अंधार होतो. त्याची शीतलता नजरेला सुखावून जाते. सभोवताली गच्च रान. प्रकाशालाही शिरायला जागा नाही. जंगलाच्या छताला आकाशीच्या सूर्याचं बिलोरी झुंबर टांगलेलं. त्यांचे कवडसे आकाशात जणू फेर धरून नाचत आहेत. अवती-भोवती कवेत मावणार नाहीत अशा झाडांच्या बुंध्यांचे खांब आकाशात सरळसोट घुसलेले. धिप्पाड योग्यासारखा त्याचा आकार आणि माथ्यावर जटांसारखा पर्णसांभार, अनेक युगं तप करत असलेला! अंगाखांद्यावर खेळणाऱ्या तरुलतांचेही भान त्या योग्यास नाही. बिलोरी छताला पोटरीपासून करंगळीपर्यंतच्या सर्व जाडीच्या वेलींची छतांपासून पायथ्यापर्यंत तोरणं लागलेली. खाली सुबक रानवाटांची रांगोळी.
जंगलाची जमीनही रात्रीच्या आकाशासारखीच. काळीशार, थंडगार. मध्येच पिवळ्या पिवळ्या, जांभळ्या, गुलाबी रानफुलांच्या चांदण्यांची नक्षत्रांची नक्षी. त्यावर छतामधून टांगलेल्या झुंबरांचे चुकार कवडसे थेट जमिनीशी पोचलेले. मधूनच दिसणारे फुलत्या पळसांचे निखारे. रानभर वेडावणारा आंब्याच्या मोहराचा सुगंध. दूरवर सुतारपक्ष्यानं ठेका धरलेला असतो. कस्तुरानं त्याच्या तालावर मंजूळ स्वर लावलेला. अगदी भुंग्याचा आणि मधमाश्यांचा तानपुराही कानांपर्यंत स्पष्ट ऐकू येतो. त्या तालावर फुलपाखारांची थिरकणाऱ्या अदा. दूरवरून येणारा अस्पष्ट ओढ्याच्या पाण्याचा आवाज. सुभग, लालचुटूक निखार, नावासारखाच राजबिंडा युवराज आदी पक्षी आपापली हजेरी लावून जातात. स्वतःला हरवून टाकणारे. काही ताडाच्या झाडांना मडकी बांधलेली. एवढीच काय ती आसपासची मानवी खूण आढळते.
भरीस भर म्हणून की काय, समोर त्या गर्द राईत एक देवालय. आतमध्ये डोंगराच्या दरडीत आदिशक्तीची ठसठशीत कुंकू लावलेली तरीही प्रेमळ दिसणारी मूर्ती, समोर ताजी फुलं वाहिलेली. थंडगार गाभारा. एक दीड फुटाची सुंदर घंटा. त्याला हलकासा स्पर्श केला तरी कित्येक आवर्तनं घेणारा सुंदर नाद. खरंच ती घडवणाऱ्या कारागिरालाही या राईनंच प्रेरणा दिली असणार...
याच आदिशक्तीच्या नावे राखलेली ही सुंदर देवराई, मंदिर, अंधार, चांदण्या, पाखरांची गाणी, उन्हाच्या कवडशांचा झिम्मा, आंब्याच्या मोहराचा सुगंध... पुन्हा पुन्हा बोलावणारी, वेडावणारी, मोहरून टाकणारी…!!! या जादूई अनुभवासाठी आजिवलीच्या देवराईला भेट द्यायलाच हवी.
कसे जाल? : पुणे-चांदणी चौक-कोळवण-जवण-आजिवली अंदाजे ५० किलोमीटर.
सोबत : थोडाफार खाऊ, पिण्याचे पाणी, टोपी. पूर्ण बाह्यांचे शर्ट, पँट, सलवार कमीज, चांगले बूट.
काय काळजी घ्यावी? : सह्याद्रीत कुठेही कचरा करू नये. आपला प्लॅस्टिकचा कचरा सोबत परत आणावा.
खाण्याची सोय : चहा आणि जुजबी नाश्त्याची सोय जवण गावात उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.