मुंबई शहर १९०० च्या दशकात सामाजिक, कलात्मक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या शिखरावर होते. या चळवळीचा एक अविभाज्य भाग असलेली वास्तू आज शंभर वर्षांनंतरही दिमाखात उभी आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाईन्स रेल्वे स्थानकापासून चालत अवघ्या दीड किलोमीटरवर रॉयल ऑपेरा हाऊसची उंच इमारत आहे. नावाप्रमाणेच तिचे बाह्य रूप पहिल्याच भेटीत प्रेमात पाडायला भाग पाडते. दगडी बांधकाम असलेली ही वास्तू आवश्यक तिथे पांढऱ्या रंगात रंगविण्यात आल्यामुळे मोठे लाकडी दरवाजे आणि खिडक्या उठून दिसतात. वास्तूच्या समोरील बाजूस शीर्षस्थानी त्रिकोणी कमान असून त्यावर ऑपेरामधील वाद्यवृंदातील मंडळी आणि प्रतिष्ठित लोकांची शिल्पे कोरलेली आहेत.
मुंबई शहर १९०० च्या दशकात सामाजिक, कलात्मक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या शिखरावर होते. या चळवळीचा एक अविभाज्य भाग असलेली वास्तू आज शंभर वर्षांनंतरही दिमाखात उभी आहे. नाटक, चित्रपट, संगीत, प्रकाशन समारंभ, महोत्सव आणि विविध प्रकारचे कार्यक्रम ‘याची देही याची डोळा’ अनुभवलेली आणि बदलत्या काळाप्रमाणे अनेक स्थित्यंतरं पाहिलेली ही एकमेव कलासक्त वास्तू म्हणता येईल. आजवर असंख्य स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनी येथे आपल्या कला सादर केल्या आहेत. काळाच्या पडद्याआड जाऊनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेणारी ही संपूर्ण भारतातील एकमेव वास्तू म्हणजे मुंबई शहराच्या सांस्कृतिक मुकुटाचा मान मिरवणारे चर्नी रोड येथील रॉयल ऑपेरा हाऊस.
कोलकात्यातील प्रसिद्ध कलाकार मॉरिस बँडमन आणि कोळसा दलाल कंपनीचे प्रमुख असलेल्या जहांगीर फ्रामजी कारका यांनी १९०८ मध्ये ऑपेरा हाऊसची मूळ संकल्पना मांडली. ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज १९११ मध्ये भारत भेटीवर आले असताना त्यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यांनीच या वास्तूला ‘रॉयल’ अशी उपाधी वापरण्याची परवानगी दिली. १९१६ मध्ये तिचे लोकार्पण करण्यात आले.
सोळाव्या शतकाच्या आसपास इटलीमध्ये उदयास आलेल्या बॉरोक शैलीत रॉयल ऑपेरा हाऊस उभारण्यात आलं आहे. न्यूयॉर्क, लंडन आणि ऑस्ट्रिया येथे या शैलीतील थिएटर्स बांधण्यात आली होती; मात्र भारतात मुंबईवगळता अन्यत्र कुठेही या शैलीतील थिएटर दिसत नाही. ब्रॉडवे शोमध्ये कलाकारांचे आवाज खणखणीत ऐकू येणे महत्त्वाचे असते. त्यासाठी छताशी समांतर असे ध्वनिसंयोजन हे ऑपेरा हाऊसचे वैशिष्ट्य आहे. रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर काळ आपोआप शंभर वर्षे मागे जातो. संगमरवरी आणि विशिष्ट नक्षीकाम असलेल्या इटालियन लाद्या, छतावरील कलाकुसर, मानवी शिल्पे, विविध प्रकारचे दिवे, छतावरील झुंबर, राजेशाही बैठक, कलात्मक टेबल या गोष्टीतून आपल्या भूतकाळातील वैभवाची प्रचिती येते.
सुरुवातीला नाटकांचे प्रयोग केल्यानंतर ऑपेरा हाऊस इतर अनेक चित्रपटगृहांप्रमाणेच एक चित्रपटगृह झाले. १९२५ मध्ये ब्रिटीश पठ्ठे यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी ते भाड्याने घेतल्यावर येथे नाटके सादर होणे बंद झाले; मात्र या रंगमंचावर बालगंधर्व, कृष्णा मास्तर, बापू पेंढारकर, मास्टर दीनानाथ, ज्योत्स्ना भोळे, लोंढे, पटवर्धन बुवा आणि पृथ्वीराज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. १९३५ मध्ये आयडिया पिक्चर्स लि.ने थिएटर विकत घेऊन त्याचे संपूर्ण नूतनीकरण केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोंडलचे महाराज श्री विक्रमसिंहजी यांनी १९५२ मध्ये ऑपेरा हाऊस विकत घेतले. तेव्हापासून आजतागायत त्याची मालकी याच कुटुंबाकडे आहे. १९९० च्या दशकात ही वास्तू बंद पडली; परंतु २००८ मध्ये वास्तूचे पुनरुज्जीवन करायचे ठरले. वास्तुविशारद आभा लांबा यांनी सतीश धुपेलिया यांच्या मदतीने वर्ल्ड मॉन्युमेंट वॉचलिस्टच्या धोकादायक अवस्थेतील ही वास्तू मुंबई महापालिकेपासून ते वारसास्थळ समितीच्या अनेक परवानग्या घेऊन आधुनिक सोयीसुविधा उभारून २०१६ मध्ये पुन्हा एकदा मुंबईकरांना सुपूर्द केली.
रॉयल ऑपेरा हाऊसचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच मुंबईचे भाषिक वैविध्य इथेही जपलेले दिसते. या थिएटरमध्ये इंग्रजीसोबतच पारशी, गुजराती, हिंदी आणि मराठी नाटकेही होत असत आणि आजही होतात. १९३४ मध्ये आचार्य अत्रेलिखित ‘घराबाहेर’ हे साडेचार तास चालणारे नाटक इथे सलग चार महिने सुरू होते. त्या नाटकाचे थेट नाट्यगृहातून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने ‘आकाशवाणी’वरून प्रक्षेपण केले होते. १९६० च्या दशकात चित्रपटांना चांगले दिवस आले तसे नाटकांचा प्रभाव ओसरत गेला. त्या वेळी अनेक हिंदी चित्रपटांनी तिथे ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी केली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘रोटी, ‘गंगा जमुना’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कपडा और मकान’ असे कितीतरी चित्रपट तिथे यशस्वी ठरले होते. ओटीटीच्या जमान्यात नाटक-चित्रपटही थिएटरमध्ये जाऊन पाहणं थोडंफार कमी झालं आहे. मात्र ऑपेरा आणि जुन्या लेखकांची भव्य नाटकं हा त्याहूनही जुना कलाप्रकार. पाश्चिमात्य असला, तरी एकेकाळी लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेला. त्याचं सौंदर्य खुलवण्यात थिएटरचा मोठा हातभार होता. आजघडीला त्या तोडीची भारतातील एकमेव वास्तू मुंबई शहरात आहे, ही या शहराची पुण्याईच म्हणता येईल. म्हणूनच या वास्तूचा भव्यपणा, सौंदर्य, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून मिळवलेला लौकिक अनुभवण्यासाठी, कलेचा आस्वाद रॉयल पद्धतीने घेण्यासाठी तिथे एकदा तरी भेट द्यायला हवी.
nanawareprashant@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.