एक दिवस विज्ञानरंजनाचा

कोणतेही शहर तेव्हाच परिपूर्ण समजले जाते जेव्हा तिथे सर्व वयोगट आणि स्तरांतील लोकांचा विचार करून सोयीसुविधा उभारल्या जातात.
dinosaur
dinosaursakal
Updated on

जिथे विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात, ते मुंबईतील ठिकाण म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र. दैनंदिन जीवनापासून ते संशोधनापर्यंतच्या अगाध विज्ञानविश्वाची कल्पना इथे आल्यावर येते.

कोणतेही शहर तेव्हाच परिपूर्ण समजले जाते जेव्हा तिथे सर्व वयोगट आणि स्तरांतील लोकांचा विचार करून सोयीसुविधा उभारल्या जातात. या सुविधा कोणत्या प्रकारच्या आहेत आणि नागरिक त्याला कसा प्रतिसाद देतात यावरून त्या शहराचे प्रतिनिधी आणि नागरिकांचा बुद्ध्यांकही ठरत असतो. शहरातील मोकळ्या जागी सर्वजण गर्दी करत असतात, पण शहराच्या प्रतिमेचे खरे दर्शन तेव्हा होते जेव्हा नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे बुद्धीला काहीतरी खाद्य मिळेल, अशा ठिकाणी लोकांना आवर्जून जावेसे वाटते. मुंबई शहरामध्येही अशी अनेक ठिकाणं आहेत. त्यातीलच एका ठिकाणाला मुद्दाम वेळ काढून प्रत्येकाने जायलाच हवे आणि पूर्वी गेले असाल तर इतरांनाही आवर्जून न्यायला हवे. या ठिकाणाचे नाव आहे ‘नेहरू विज्ञान केंद्र’ - जिथे विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजावून सांगितल्या आहेत. ज्या कुठल्याही वयोगटातील लोकांना कंटाळवाण्या न वाटता बुद्धीला चालना देतात.

मुंबई रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी रेल्वेस्थानकात उतरून टॅक्सी किंवा बसने ‘नेहरू विज्ञान केंद्र’ गाठता येते. केंद्राच्या दरवाजातून आत शिरताचक्षणी ‘आय लव्ह सायन्स’ हे ठळक अक्षरात लिहिलेलं दिसतं. विज्ञान हा विषय कितीही कठीण वाटला तरी तो दैनंदिन आयुष्यातील गोष्टी, घटनांमधून समजावून सांगितला तर सोपा वाटू शकतो आणि त्यासाठी तुमची मानसिकता तयार करण्याची सुरुवात विज्ञानाचा त्रागा करून नाही तर विज्ञानावर प्रेम करूनच होऊ शकते, यासाठी हा सेल्फी पॉईंट महत्त्वाचा ठरतो. केंद्राच्या आवारात वाफेचे इंजिन, ट्रामचा डबा, हवाई दलाचे विमान आणि विविध शास्त्रज्ञांचे अर्धपुतळे ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे डायनासोर, हत्ती आणि नष्ट झालेले इतर जीवजंतू त्यांच्या माहितीसह पाहायला मिळतात.

नेहरू विज्ञान केंद्राचा पाया कचराभूमीचा कायापालट करून रचण्यात आला आहे. १९७७ साली या कामाला सुरुवात झाली. सर्वप्रथम १९७९ साली येथे पहिल्यांदा मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारले गेले. चार भिंतीच्या आत नव्हे तर मोकळ्या वातावरणात विज्ञान समजून घेता यावे हा यागामागचा उद्देश होता. विज्ञान केंद्रातील हे उद्यान जगातील पहिले विज्ञान उद्यान असून विशेष म्हणजे भारतात याची निर्मिती झाल्यानंतर या संकल्पनेच्या धर्तीवर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतही अशीच विज्ञान उद्याने उभारण्यात आली. उद्यानात ध्वनी, बल, शारीरिक अवयव आदी वैज्ञानिक संकल्पना खेळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

आज अस्तित्वात असलेले विज्ञान केंद्र १९८५ साली सुरू झाले. येथे प्रयोगशील वैज्ञानिक खेळांची मांडणी करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनापासून ते संशोधनापर्यंतच्या अगाध विज्ञान विश्वाची कल्पना इथे आल्यावर येते. केंद्रामध्ये सायन्स फॉर चिल्ड्रेन, प्रवास इतिहासाचा, प्रकाश, ध्वनी, विमाने आणि अंतराळयान असे विविध विभाग आणि मिरर गॅलरी आहे. विविध संकल्पनांवर आधारित १२ खोल्यांमध्ये मुख्यत्वेकरून प्रकाश, ध्वनी, वास, स्पर्श, चव अशा ज्ञानेंद्रियांशी निगडित वैज्ञानिक प्रयोग मांडण्यात आले आहेत. ध्वनी म्हणजे काय, त्याचे प्रकार, प्रकाश का दिसतो या प्रश्नांची उत्तरे साध्या-सोप्या प्रयोगांमधून आणि विश्व उत्पत्तीपासून ते जीवसृष्टीतील प्राणिजीवन, जल, वायू परिवर्तन अशा गोष्टींची माहिती येथे मिळते. भारतातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवताना स्थापत्यशास्त्र, शिल्प, वस्त्रनिर्मिती, धातू आणि गणिताची निर्मिती अशा विविध विषयांवर प्रकाश टाकणारी गॅलरीसुद्धा इथे आहे. या सर्व गोष्टी लहान मुलांच्या ज्ञानात भर घालतातच, पण मोठ्यांनाही यानिमित्ताने अनेक गोष्टी नव्याने कळण्यास मदत होते.

विज्ञान केंद्रामध्ये मुलांसाठी थ्रीडी विज्ञान शो, तारांगण, आकाश दर्शनाचे कार्यक्रमही आयोजित केले जात असतात. याचसोबत विज्ञान प्रश्नमंजूषा, विज्ञान उत्सव, विज्ञान प्रदर्शनांचेही आयोजन केले जात असते. त्यामुळे केंद्राला ठरवून भेट दिल्यास या सर्व उपक्रमांमध्येही सहभागी होता येऊ शकते. शाळेत विज्ञान शिकण्याला मर्यादा असतात. आता तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचे स्वरूपच बदलले आहे. अशा वेळी विज्ञानाची आस असलेल्या प्रत्येकाला विज्ञान समजून घेण्याची संधी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे साकारण्यासाठी वर्कशॉप असून तंत्रज्ञांच्या मदतीने ५०० हून अधिक वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा उपकरणांची खरेदी मुलांसाठी सर्वोत्तम भेट ठरू शकते. विज्ञान केंद्राची उभारणी मुलांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलेली असली तरी मोठ्या व्यक्तींनाही खिळवून ठेवतील अशा विज्ञानाच्या अनेक गमतीजमती येथे आहेत. मुलांना विज्ञानाचे धडे देता देता स्वतःचेही प्रबोधन करून घेण्याची पालकांसाठी ही नामी संधी म्हणता येईल. त्यामुळे एक दिवस फक्त मनोरंजनाऐवजी विज्ञानरंजनासाठी खर्च करण्यास कुठल्याच पालकांची हरकत नसावी.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.