प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन अंतर्गत विकासासाठी १२७.१५ कोटी रुपये मंजूर केले आहे.
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली.
या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यामध्ये क्षेत्र महाबळेश्वर (Mahabaleshwar) विकासासाठी १८७ कोटी ४२ लाख, प्रतापगड किल्ल्याच्या जतन, संवर्धन आणि विकासाकरिता १२७ कोटी १५ लाख, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पासाठी ४४ कोटी ९९ लाख तर कोयना जलपर्यटनासाठी २२ कोटी सहा लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा समावेश आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यामध्ये मंदिर व परिसर विकास व संवर्धन, रस्ते वाहनतळ, बाजारपेठ विकासकामे, शौचालय, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्था, अन्नछत्र, विद्युतीकरण, आरोग्य, पुतळा उभारणे, मंदिर परिसरात अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्थापन व निर्मिती करणे, भूसंपादन, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा उभारणे, आदी विविध विकासकामांचा समावेश असून, यामुळे क्षेत्र महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन अंतर्गत विकासासाठी १२७.१५ कोटी रुपये मंजूर केले असून, यामध्ये किल्ला जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे, मंदिरे संवर्धन कामे, संग्रहालय निर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल रूम, ध्वनिक्षेपक, प्रेक्षक गॅलरी, ऐतिहासिक वस्तुविक्री दालने, पार्किंग, क्यूआर कोड आधारित माहितीफलक, लैंडस्केफिंग वर्क, शौचालय, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्था, विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश आहे.
मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार असून, नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. मुनावळे येथे नदीत जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ आणि एमटीडीसी यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याठिकाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस्चे विविध प्रकार, बोटिंग करता येणार आहे. त्यामुळे परिसरात त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीकरिता वाहने आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या आराखड्याच्या मंजुरीमुळे क्षेत्र महाबळेश्वर आणि प्रतापगड पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असून, या माध्यमातून येथील युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि या गावांना आर्थिक बळकटी व चालना मिळणार असल्याचे यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना जलपर्यटन या ठिकाणचा विकास होण्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आग्रही होतो. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम घाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, इको टुरिझम आराखडा तयार करून शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार समितीने चार महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता दिली आहे.
-उदयनराजे भोसले, खासदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.