कास पठारावर एकाच ठिकाणाहून प्रवेश दिला जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी एकाच ठिकाणी एकत्र येऊन पर्यटकांसह यंत्रणेचेही हाल होत आहेत.
कास : जागतिक वारसास्थळ असलेल्या कासचा (Kaas Pathar) फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांनी रविवारी सुटीच्या दिवशी गर्दी केली होती. गर्दीने मात्र कासवरील नाजूक फुले अक्षरशः गुदमरून गेली. त्यामुळे येथील व्यवस्थापन समिती दुपारनंतर अक्षरशः हतबल झाली. दुपारनंतर आलेल्या पर्यटकांना बुकिंग मशिन बंद करून तुम्ही कोठेही जा; पण पठारावर प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका घ्यावी लागली.
ऑनलाइन बुकिंग (Online Booking) करून साधारणपणे तीन हजार लोक येतात, तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच हजारांच्या वरती होती. एकूण दहा हजारांहून अधिक पर्यटक एकाच दिवशी पठारावर आल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली. व्यवस्थापन समितीने ऑफलाइन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्याने आणि पार्किंगची जागा फुल्ल झाल्याने रस्त्याच्या कडेला गाड्या लावत पठारावर चालत जाणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली.
कास समितीमार्फत गर्दी नियंत्रणासह पठारावर देखभाल करण्याचे काम कसोशीने सुरू होते; पण मोठ्या गर्दीपुढे ही यंत्रणा तोकडी पडल्याचे दिसून आले. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे झाले असून, अजून काही दिवस राहणार आहेत. त्यामुळे शनिवार व रविवार मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या दोन दिवशी फक्त बुकिंग करून येणाऱ्या लोकांनाच प्रवेश देणे आवश्यक आहे.
कास पठारावर एकाच ठिकाणाहून प्रवेश दिला जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी एकाच ठिकाणी एकत्र येऊन पर्यटकांसह यंत्रणेचेही हाल होत आहेत. त्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या गावांतील पर्यायी मार्गाचा शनिवार आणि रविवारी वापर केल्यास गर्दी टाळून पर्यटन सुलभ करता येणार आहे.
कास पठारावर एका व्यक्तीसाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. आज झालेल्या गर्दीचा फायदा घेत अनेकांनी फुकटात दर्शन घेतल्याचे बोलले जात होते, तर अनेकांनी ओळखीचा वशिला लावत पठारावर प्रवेश करून फायदा उचलला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.