Konkan Tourism : शेकडो प्रकारच्या जीवांना आसरा देऊन अंगाखांद्यावर खेळवणारा 'कोकण सडा'
सड्यांवर पावसाळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पतीजीवन आढळून येतं. इथली भौगोलिक रचना पाहिली असता पावसाळ्याचे काही महिने सोडले तर इतर वेळेला इथे पाण्याची कमतरता असते.
-प्रतीक मोरे, देवरूख moreprateik@gmail.com
भगवान परशुरामांनी (Bhagavan Parashuram) बाण मारून समुद्र हटवला आणि प्रकट झाली ती स्वर्गीय कोकणभूमी. पश्चिमेला सह्याद्रीचे (Sahyadri) राकट कडे आणि पूर्वेला गाजणारा समुद्र अशा चिंचोळ्या पट्टीत नारळी-पोफळीच्या बागा भाताच्या हिरव्यागार शेतीत वसली आहे ही देवभूमी. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचाली आणि त्यातून झालेली भूपृष्ठाची रचना, कुठे ताशीव कडे, कुठे नद्यांनी पोखरलेली अरुंद खोरी, तर कुठे वाळूच्या पुळणी आणि सागर किनारे आणि यालाच समांतर अशी कातळाची सपाट मैदाने. या भूरूपांनी इथलं जीवन घडवलं, त्याला आकार दिला, जगण्याची प्रेरणा दिली.
इथले जीवन हवामान (Weather) पर्यायाने निसर्गावर इतकं अवलंबून आहे की, त्याच्या लहरीपणामुळे फटके कोकणाची लेकरं हसतमुखाने सहन करतात आणि नारळासारख्या वरून कठीण कवचासारखी कोकणी माणसं आतून मात्र गोड मधाळ खोबऱ्यासारखी असतात. या भूमीतील भूरूपेसुद्धा अशीच वरून उजाड, पडीक, नापीक दिसणारी आणि आणि भूगर्भतून उगम पावणाऱ्या शेकडो प्रकारच्या जीवांना आसरा देऊन अंगाखांद्यावर खेळवणारी. असेच एक भूरुप म्हणजे सडा...
सडा म्हणजे जांभा दगडाच्या म्हणजेच लँटेराईट या लाल रंगाच्या रूपांतरित दगडा पासून बनलेली विस्तीर्ण माळराने. यांना इथल्या बोलीभाषेमध्ये सडा असे म्हणतात. खरंतर सडा हा शब्द न ऐकलेला कोकणी माणूस विरळाच, तरीही मानवी वस्तीने गुदमरली गावकुस ओलांडून जसजसं आपण बाहेर पडतो तसे कोकणातल्या बहुतेक अशा गावांमध्ये असे माळ पाहायला मिळतात. काळाकभिन्न कातळ उन्हाच्या तप्त झळांनी तापत इथे पहुडलेला दिसतो.
गवताच्या सुकत आलेल्या आणि वाऱ्याच्या झोताने इकडून तिकडे उडणाऱ्या काड्या, पिवळीशार कोचे, करवंदीच्या जाळ्या इतकीच काय ती इथली परिस्थिती. मग अचानक समुद्रावरचे खारे वारे वेगाने वाहू लागतात, एखादा विजेचा लोळ पावसाचा संदेश घेऊन कातळावरती आदळतो आणि मान्सूनच्या आगमनाची चाहूल तृषार्त झालेल्या प्राणिमात्रांना देतो. टिटव्या ओरडू लागतात, पावश्याचे आर्त स्वर चहुबाजूने कानावर पडू लागतात, जलधारांचा वर्षाव धरतीवर होतो आणि आकाशातून कोसळणारे थेंब कातळाच्या छातीला जणु भेगा पडतात आणि या भेगातून हजारो प्रकारच्या वनस्पती प्रकट होतात.
पावसाचं पाणी कातळात मुरत नाही ते डबकी छोटी तळी यामध्ये साचून राहतं, तर कुठे कातळात असलेल्या भेगांमधून शेजारच्या गावातील विहिरींना जाऊन मिळतं. हिवाळ्यापासून जमिनीच्या आत दडून बसलेली बेडके आता सुरतालात गुंजारव करण्यासाठी कातळावर प्रकटतात. तर कुठे छोट्याश्या नाल्याडबक्यात साचून राहिलेले मळ्याचे मासे अंडी देण्यासाठी लगबग करू लागतात. चतुर गोगलगायी खेकडे, कोळंबी असे अनेकविध जीव आपले जीवनक्रम चालू करण्यात व्यस्त होतात आणि यांवर अवलंबून असलेले अनेक विविध पक्षी, साप, सरडे, पाली, कोल्हे, साळींदर, रानमांजर, बिबटे सुद्धा हजेरी लावतात. उन्हाळ्यात जिथे निर्जीवतेचं अधिराज्य होते त्या सड्यांवर आता श्रावणोत्सव सुरू झालेला असतो.
सड्यांवर पावसाळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पतीजीवन आढळून येतं. इथली भौगोलिक रचना पाहिली असता पावसाळ्याचे काही महिने सोडले तर इतर वेळेला इथे पाण्याची कमतरता असते. वनस्पतींना अत्यावश्यक असणारी पोषणमूल्ये आणि वाढण्यासाठी लागणारे मृदा ही पाण्यानेच वाहून येत असल्यामुळे येथे बारमाही वनस्पती आढळत नाहीत. वर्षाचे आठ महिने कोरडे राहूनही पावसाळ्यात ओलेकच्च होणाऱ्या सड्यांवर शुष्क आणि पाणथळ अशा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती जोमाने वाढतात.
येथील सतत बदलणारे हवामानाशी सुसंगत होण्यासाठी या वनस्पती अनुकुलित झाल्या असून विविध प्रकारची उत्परिवर्तने यांमध्ये आढळून येतात. या वनस्पतींचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांचा एकाच वेळी आणि एकाच जागी मोठ्या प्रमाणात येणारा पावसाळी बहर. कातळातील भेगा, छिद्रे, खळगे यामध्ये अशा अनेक वनस्पतींना आश्रय मिळतो. इथल्या राकट जीवनाला सामोरे जाण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेला पहिला बदल म्हणजे कंद निर्मिती. दीपकाडी, गडंबी कांदा, चिकर कांदा, चोहोळा, मुसळी, कंदील पुष्प, फोडशी अशा अनेक कंदवर्गीय वनस्पती हे सड्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. (क्रमशः)
(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.