Kauai island : अमेरिकेतल्या या निसर्गरम्य बेटावर आहे शिवलिंग अन् एकमेव रूद्राक्षांचे वन..

हिलो या राजधानीत केवळ एक दहाबारा मजली इमारती आहेत. तर कोना या शहरात मोजक्या उंच इमारती दिसतात.
Kauai island
Kauai islandesakal
Updated on

Kauai island : हवाईच्या आठ बेटांपैकी कौवाई बेटाचा खास उल्लेख करावा लागेल, तो तेथील नितांत सुंदर निसर्गासाठी, ग्रँड कॅन्यनसारख्या वाईमिया कॅन्यनसाठी, शिव, गणेश व कार्तिकेयाच्या दाक्षिणात्य बांधणीच्या कडवुल मंदिर वजा मठासाठी व अमेरिकेतील एकमेव रूद्राक्षांच्या वनासाठी. गेल्या आठवड्यात या बेटाला भेट देण्याची संधी मिळाली.

ओहाऊ ही हवाईची राजधानी असल्याने तिचे पूर्ण शहरीकरण झाले आहे. तसेच, काहीसे कमी परंतु शहरीकरण झालेले बेट आहे, ज्वालामुखीचे व हिरव्या, अनोख्या लाल, काळ्या व हिरव्या रंगाच्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यांचे - बिग आयलँड. त्याच्या हिलो या राजधानीत केवळ एक दहाबारा मजली इमारती आहेत. तर कोना या शहरात मोजक्या उंच इमारती दिसतात.

माऊई या बेटाचेही. तथापि, कौवाई या बेटावर एकही उंच इमारत नाही. सर्वत्र एक अथवा दोन मजली इमारती व घरे. भोवती उंचउंच पर्वतराजी, जंगलातून वळत घेत जाणारे रस्ते व त्यांच्याशी संगत करणारा प्रशांत महासागर. कुठेही जा, निसर्ग तुमचे स्वागत करतो. नागमोडी वळणे घेत जाणाऱी वायलुआ नदी, तिच्यात शांतपणे विहार करणाऱ्या कॅनोज व अन्य नौका हे आणखी एक दृश्य.

तेथील कायमचे आकर्षण आहे, ते श्वेतवर्णीय सद्गुरू शिवाय सुब्रमण्यस्वामी यांनी 1970 मध्ये स्थापन केलेल्या मंदिराचे. त्याचा परिसर तब्बल 382 एकरांचा असून, त्यात एक नवे संगमरवरी मंदिर बांधले जात आहे. आज पर्यटकांसाठी तो भाग वर्ज्य असला, तरी कडवुल ( देव) मंदिराच्या भोवती असलेल्या वनात तपस्या करण्यासाठी छोटे वन आहे.

त्यात ब्रह्मा विष्णू व महेशची (दत्तमूर्ती) पूर्णाकृती मूर्ती आहे. परिसराला वळसा घालताना दिसते, ती शंकराची पिंड, शिवपार्वतीचा जोड पुतळा व गणेशाची मूर्ती. मंदिराचे प्रवेशद्वार साध्या काळ्या कमानीचे आहे. आत जाताना दिसतो, तो भव्य नंदी व त्यापुढे मंदिराचा गाभा.

आम्ही गेलो तेव्हा विद्यमान श्वेतवर्णीय सद्गुरू बोधिनाथ वेलयस्वामी आरतीची निरांजन घेऊन गाभाऱ्यात आले होते. त्यांच्या गळ्यात जानवे होते. त्यांनी प्रथम गणेश, महादेव व कार्तिकेयाच्या आरत्या केल्या, त्यांना फुले वाहिली.

कोपऱ्यात असलेल्या चांदीच्या त्रिशुलाची व नंतर नंदीची आरती केली. यावेळी पाच ते सहा श्वेतवर्णीय भक्त व सुमारे डझनभर भारतीय पर्यटक उपस्थित होते. मंदिराला जायचे असेल, तर त्याचे बुकिंग आधीच करावे लागते. मंदिर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व नंतर दुपारी 4 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले असते.

विशेष म्हणजे, तेथील व्यवस्था पाहणाऱ्या श्वेतवर्णीय स्त्री भक्त व्हिला इनांडा या मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या. अनेक वर्षापासून तेथे सेवेत आहेत. मंदिराच्या आतील भिंतींवर असलेल्या शेल्फवर अर्धनारी नटेश्वर व देवदेवतांच्या तांब्याच्या 108 मूर्ती आहेत.

मंदिराची छायाचित्रे घेण्यास मनाई असली, तरी परिसरातील मूर्तींची छायाचित्रे घेता येतात. मंदिरात प्रवेश करताना परिधान करावयाची वस्त्रे (रंगीबेरंगी लुंग्या) ही मंदिराबाहेर ठेवलेली होती. दर्शन घेताना त्या घालायच्या व नंतर परत तेथेच ठेवायच्या. पादत्राणे ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे.     

मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे, अमेरिकेतील रूद्राक्षांच्या वृक्षांचे एकमेव वन. त्यात सुमारे सव्वाशे झाडं आहेत. वनाबाहेर दिसतो तो त्या वनाकडे पाहाणाऱ्या व बांधल्या जाणाऱ्या मंदिराची ( इरावियन पद्धतीचे) प्रतिकृती तळहातावर घेतलेल्या महाकाय हनुमानाचा कृष्णवर्णीय पुतळा.

शेजारच्या ऋषि खोऱ्यातून (ऋषि व्हॅली) खळखळ वाहणारे अनेक झरे आपल्याला दिसतात. चॉकलेटी व निळ्या रंगांच्या रूद्राक्षांचा व लाल चुटुक पानांचा पडलेला सडा सर्वत्र दिसतो. किती वेचू अन् किती नको, असे त्याकडे पाहून होते. रूद्राक्ष शंकराला आवडतात. त्याच्या छायाचित्रात त्यांची माळ गळ्यात व हातात घातलेली दिसते.

तसेच, एकमुखी रूद्राक्ष ते बहुमुखी रुद्राक्षांचे गूण काय, याची माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. शंभरएक वर्षापूर्वी आलेल्या भारतीयाने त्यांची लागवड इथे केली व हे वन उभे राहिले. त्याच्यासमोर दिसणाऱ्या बांबूच्या वनातील कमानीतून सद्गुरूंनी तयार केलेला मार्ग दिसतो`` तो सन्मार्ग,’’ असे फलकावर लिहिले आहे. या सर्व परिसरातून फिरताना प्रसन्न तर वाटतेच, परंतु, इश्वराच्या सान्निध्यात वावरल्याची अनुभूती मिळते.

मंदिरातील वाचनालयात हिंदु धर्म व संस्कृतीविषयक अनेक ग्रंथ आहेत. ते कुणालाही अभ्यासासाठी उपलब्ध असतात.    

कौआई हे होनोलुलुपासून विमानाने केवळ 20 मिनिटांवर असलेले बेट. या बेटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे कोंबड्यांची संख्या तेथील 75 हजार लोकसंख्येपैकी कितीतरी पटींनी अधिक आहे. त्यामुळे लिहुए विमानतळावर तुमचे स्वागत करण्यापासून ते सारी उपनगरे, वस्त्या, मॉल्सचे परिसर, नैसर्गिक जंगले यातून त्यांचा सतत वावर दिसतो. (Travel & Tourism News)

Kauai island
Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

त्याचे कुकुचिकू सतत कानावर येत असते. या कोंबड्याही एका पर्यटकाने शंभर वर्षांपूर्वी भारतातून आणल्याचे सांगितले जाते. तसेच, चिमण्या, साळुंक्या, पारवे व अन्य पक्षीही त्याने हवाईला आणले होते.

बेटाची भ्रमंती करताना प्रशांत महासागराचे रम्य किनारे, नेपाली किनाऱ्यावरील करवतीसारख्या कडा असलेले (सिरेटेड) हिरवे डोंगर त्यावरील समुद्र पक्षी, बारमाही पावसांची जंगले, धबधबे, डोंगर व दऱ्या पाहावयास मिळतात. (Tourism)

पोईपू किनाऱ्यानजिक `स्पाउटिंग हॉर्न’ नावाचे एक स्थळ आहे. किनारा ज्वालामुखीच्या सपाट दगडांनी व्यापलाय. त्याला असलेल्या मोठ्या छिद्रातून  किनाऱ्यावर  आपटणाऱ्या लाटांमुळे पन्नास साठ फूट उंच उडणाऱ्या फवाऱ्यांना पाहाताना एक वेगळाच अनुभव येतो. शेजारीच असलेल्या बारीक छिद्रातून हॉर्नसारखा मोठा ध्वनि सतत येत असतो.

Kauai island
Monsoon Tourism : प्राचीन काळापासून सात देवतांचं निवासस्थान असलेलं विदर्भातलं हे ठिकाण, एकदा नक्की बघा

कौआईतील समुद्राचे नितळ पाणी, त्यातील कोरल्स, रंगीबेरंगी मत्स्य संपत्ती यामुळे पर्यटकांची एकच गर्दी येथे आढळते. `वायलुवा शेव आइस’ च्या दुकानातही गर्दी असते. आपल्याकडे बर्फाचे रंगीबेरंगी गोळे विकणारे गावागावातून आढळतात. तसे असंख्य फळांच्या शेव आइसचा आस्वाद घेणारे पर्यटकही कौआईत एकच गर्दी करतात.

- विजय नाईक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.