व्हिडीओ गेम्सच्या जगामध्ये तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला कम्प्युटर, प्लेस्टेशन, एक्सबॉक्स अशा विविध प्रकारच्या डिव्हाईसेसच्या साहाय्याने खेळल्या जाणाऱ्या गेम्सची माहिती मिळालीच असेल. पण गेम्स खेळण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमचा फोन घ्या आणि जी वाटतेय ती गेम डाऊनलोड करून खेळा. बहुतांश गेम्स अँड्रॉईड आणि अॅपल दोन्हीच्या प्ले आणि अॅप स्टोअरवर मिळतात.
पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गेम्सच्या बाबतीत असं नसतं की एकच गेम सगळेजण खेळू शकतात. वेगवेगळ्या लोकांची आवडनिवड, गरजा, वय या सगळ्या गोष्टी पाहून वेगवेगळ्या गेम्स तयार केलेल्या आहेत. म्हणजे शूटिंग-फायटिंग गेम्स आहेत, हाय फँटसी गेम्स आहेत, कॅज्युअल गेम्स, कोडी, सिंगल प्लेअर, मल्टी प्लेयर अशा अनेक पद्धतीच्या गेम्स तुम्ही शोधून त्यांचा आनंद घेऊ शकता.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही सोप्या गेम्सविषयी माहिती देणार आहोत. या गेम्स तुम्ही जर या क्षेत्रात नवे असाल तर सहज खेळू शकता. तसंच तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गेम्स आवडतात, हे तुम्हाला या गेम्स खेळल्याने स्पष्ट होईल. या गेम्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि या तुम्हाला मोफत प्ले स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरला मिळू शकतात.
डुडल जम्प
डुडल जम्प ही गेम अगदी साधी सोपी आहे. यामध्ये वरुन खाली येणाऱ्या एका प्राण्याला तुम्हाला वाचवायचं आहे. हा प्राणी खाली येत असताना मधे अडथळे येतील. या अडथळ्यांमधून तुम्हाला या प्राण्याचा वाचवायचं आहे. खरंतर या गेमला असा शेवट नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या अडथळ्याला थडकाल किंवा मध्ये येणाऱ्या एखाद्या राक्षसाकडून मारले जाल, तेव्हा ही गेम संपेल आणि पुन्हा नव्याने सुरू होईल.
टेम्पल रन
टेम्पल रन ही गेमसुद्धा एक न संपणारी गेम आहे. ही एक 3D गेम आहे. यामध्ये एक माणूस आपल्याकडे असलेल्या प्राचीन वस्तूंना वाचवत पळत असतो. या माणसामागे एक माकडासारखा दिसणारा रानटी प्राणी पळत असतो. या प्राण्यापासून आपल्याला या माणसाला वाचवायचं आहे. यामध्ये तुम्हाला बारीक रस्त्यांवरून, पुलावरून, धबधब्यांमधून मार्ग काढायचा आहे. इथून कुठूनही खाली पडलात किंवा या माकडाच्या हाती लागला तर तुम्ही गेममधून बाहेर पडता. यामध्ये तुम्हाला पाँईट्सही कमावता येतात. तसंच रस्त्यामध्ये हिरेही सापडतात.
फ्रूट निंजा
फ्रूट निंजा ही गेम लहान मुलांसह मोठी माणसंही खेळू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर स्वाईप करून स्क्रिनवर येणारी फळं कापायची असतात. एका स्वाईपमध्ये एकापेक्षा जास्त फळं कापली, तर तुम्हाला गुणही मिळतात. या मध्ये खेळता खेळता अचानक एखादा बॉम्बही येतो. जर तुम्ही चुकून बॉम्बवर स्वाईप केलं, तर तुम्ही गेममधून बाहेर पडता. अशा तीन लाईफ तुम्हाला मिळतात. तिन्ही संधी घालवल्या तर तुम्हाला गेम नव्याने सुरू करावी लागते.
कॅन्डी क्रश
कॅन्डी क्रश या गेममध्ये तुम्हाला विशेष डोकं चालवण्याची गरज नाही. तुम्ही फार काही चिंता न करता ही गेम खेळू शकता. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की जास्तीत जास्त जागा तुम्हाला रिकाम्या करायच्या आहेत. मग यामध्ये तुम्ही सारख्या कँडीला बाजूला सारू शकता. यातून तुम्हाला पाँईंट्स मिळतात. जसंजसं तुम्ही पुढच्या लेव्हलला जाल, तशी तशी काठिण्य पातळी वाढत जाते.
प्लान्ट्स व्हर्सेस झोम्बी
प्लान्ट्स व्हर्सेस झोम्बी या गेममध्ये तुम्हाला झोम्बींना घरात जाण्यापासून वाचवायचं आहे. हे करण्यासाठी तुम्हाला झाडांची मदत घ्यायची आहे. प्रत्येक झाडाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. काही झाडं झोम्बींना खाऊन टाकणारी आहेत तर काही झाडं त्यांच्यावर मारा करणारी आहेत. तर काही फक्त त्यांची वाट अडवतात. तुम्हाला थोडंसं डोकं चालवून योग्य झाडं निवडायची आहेत आणि झोम्बींना रोखायचं आहे. हे रोखण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात तर झोम्बी घरात शिरतात आणि तुम्ही तिथेच हरता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.