आता रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना आणि तुमच्या पाळीव कुत्र्याला विचार करूनच खायला द्या. पोट भरले आहे की नाही हे न समजता लोक अनेकदा विचार न करता त्यांना खायला घालतात. असेच काहीसे एका महिलेने केले. ती दररोज तिच्या पाळीव कुत्र्याला आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खायला घालायची. असे केल्याने एके दिवशी कुत्र्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महिलेला यासाठी तुरुंगात जावे लागले.
हे संपूर्ण प्रकरण न्यूझीलंडचे आहे. येथे एका महिलेला 2 महिने तुरुंगवास भोगावा लागला. या महिलेवर आरोप आहे की, तिने आपल्या पाळीव कुत्र्याला जास्त अन्न खायला दिले, त्यामुळे तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. रॉयल न्यूझीलंड सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स (SPCA) नुसार, प्राणी नियंत्रण अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये या महिलेच्या निवासस्थानाची झडती घेतली तेव्हा त्यांना नुगी नावाचा हा कुत्रा तिथे दिसला.
जास्त खाल्ल्याने कुत्र्याचे वजन ५३.७ किलो झाले होते. त्याच्या शरीरावर चरबीचा एवढा जाड थर होता की कुत्र्याच्या हृदयाचे ठोके ऐकणेही कठीण झाले होते. त्यावेळी कुत्र्याला कंजंक्टिवायटिस होते आणि त्याची नखे जास्त वाढलेली होती. कुत्र्याची अवस्था इतकी वाईट होती की 10 मीटर चालण्यासाठी त्याला तीन वेळा थांबावे लागले.
या महिलेची चौकशी केली असता तिने कबुली दिली की, बिस्किटे आणि कुत्र्याचे जेवण याशिवाय ती दररोज 8 ते 10 चिकनचे पीस तिच्या पाळीव कुत्र्याला खाऊ घालत असे. टॉड यांनी सांगितले की, जे लोक कोणताही प्राणी पाळतात त्यांनी त्यांचे 'पेट' किती अन्न खाईल याचीही काळजी घेतली पाहिजे आणि जर त्यांनी जास्त खाल्ले तर ते गंभीर आजारी पडू शकतात.