नाशिक / मालेगाव : कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावमध्ये विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि मरण पावलेल्यांची संख्या जरी वाढत असली तरी अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचा प्रकार समोर आला आहे. या मृत्यूंची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनसमोर उभे ठाकले आहे.
दोन कब्रस्तानांमध्ये एप्रिलमध्ये दफन केलेल्यांची संख्या आश्चर्यकारक
मालेगाव मध्य भागातील बडा कब्रस्तानमध्ये गुरुवारपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याच्या 23 दिवसांत 260 जणांचा दफनविधी झाल्याची आकडेवारी समोर आली असून, आयेशानगर कब्रस्तानात साठहून अधिक जणांचे दफन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. 24)पासून रमजानपर्व सुरू होत आहे. प्रत्येक जणाचा रोजा असेल. उपवासामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होईल. परिणामी, कोरोनाव्यतिरिक्त होणारे मृत्यू आणखी वाढू शकतील, अशी भीती आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा विस्फोट अन् आकडा वाढला
माहीतगार सूत्रांच्या मते, शहरातील सर्वांत मोठ्या बडा कब्रस्तानमध्ये एरवी दिवसाला सरासरी सहा, तर आयेशानगर कब्रस्तानात रोज दोन मृतदेह दफन केले जातात. कोरोना विषाणू संसर्गाचा विस्फोट झालेल्या एप्रिल महिन्यात हे प्रमाण दुपटीने वाढल्याची बाब समोर आली आहे. या सर्व वयोगटातील मृतांचा समावेश आहे. दाट लोकवस्ती, यंत्रमागामुळे होणारे वायुप्रदूषण, शहरातील क्षयरोगाचे अधिक प्रमाण, अस्वच्छता व अन्य कारणाने रुग्णांची संख्या वाढल्याचे मानले जात आहे. याशिवाय मधुमेह, हृदयविकार, गुंतागुंतीची प्रसूती, कमी वजनाची नवजात बालके आणि खासगी दवाखाने बंद असल्याने न होत असलेला उपचार ही कारणेदेखील या वाढत्या संख्येमागे असावीत, असे सांगितले जाते.
संसर्गाच्या अनामिक भीतीमुळे आत्महत्यांची शक्यता
वाढत्या मृत्यूंची अनेक कारणे असावीत. दैनंदिन जीवनचर्येत बदल, कोरोना संसर्गाची भीती, यामुळे ताणतणाव वाढले आहेत. काही आजारांनीही त्यामुळे तोंड वर काढले असावे. संसर्गाच्या अनामिक भीतीमुळे आत्महत्यांची शक्यता निर्माण झाली आहे. काही जण रुग्णालयापर्यंत पोचले नसतील. काहींनी आजार लपविला असेल. सध्या तरी घरातच राहणे, आरोग्यदायी खाणे, प्रतिकारक्षमता वाढविणे, आनंदी राहणे, व्यायाम, योगासने हाच पर्याय आहे. -डॉ. मनोज दसपुते, मानसोपचारतज्ज्ञ
हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन् नैराश्य
बडा कब्रस्तानमध्ये 12 एप्रिलपासून दफनविधी
12 एप्रिल ः 10
13 ः 8
14 ः 9
15 ः 24
16 ः 14
17 ः 14
18 ः 18
19 ः 17
20 ः 22
21 ः 18
22 ः 25
23 ः 15
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.