पंचवटी (नाशिक) : कोरोनामुळे रोजगार गमवावा लागलेल्या दिव्यांग युवकाने (दिनदर्शिका) कॅलेन्डर विक्रीच्या माध्यमातून दिव्यांग असलेल्या पत्नीसह जीवनाचा लढा सुरूच ठेवला आहे. स्वतःच्या डोळ्यासमोर केवळ अंधारच असतांना दीड वर्षाच्या चिमुरड्याला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्नदेखील त्याने पाहिले आहे.
मुलाला अभियंता बनविण्याचे स्वप्न
पारनेर (जिल्हा नगर) येथील ज्ञानेश्वर विश्वनाथ क्षीरसागर हा जन्मजात दिव्यांग. पाठीवर आणखी तीन भाऊ व आई-वडील असा सगळ्यांचा जीवनाचा लढा सुरू. यातील ज्ञानेश्वरने दिसत नसूनही काहीतरी करू या जिद्दीने नाशिक गाठले. जगण्यासाठी काहीतरी करावे, म्हणून एका शाळेत नोकरी सुरू केली. परंतु कोरोनाच्या कहरात हा रोजगारही गेला, तेव्हापासून ज्ञानेश्वर दिनदर्शिका विक्री व अन्य कामे करून उपजिविका करतो आहे. २०१७ मध्ये त्याचा दिव्यांग असलेल्या लक्ष्मीशी प्रेमविवाह झाला. दीड वर्षात त्यांच्या जीवनवेलीवर नवे फुल उमलले. त्यांचा मुलगा परिस आता दीड वर्षांचा झाला आहे. तो डोळस व हुषार असल्याने त्याला अभियंता बनविण्यचाचे स्वप्न या पती पत्नीने पाहिले आहे.
प्रतिकुल परिस्थितीतही जगण्याचा लढा सुरूच
म्हसरूळ गावात भाड्याची खोली घेऊन राहणारा ज्ञानेश्वर गेल्या महिन्यापासून महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर कॅलेन्डर विक्री करतो. त्याद्वारे दिवसाला तीनशे ते चारशे रूपयांची कमाई होत असल्याचे त्याने सांगितले. त्यातील साधारण शंभर रूपये रिक्षा भाड्यावर खर्च होतात, असे त्याने सांगितले. ज्ञानेश्वर म्हसरूळपासून दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपापर्यंत चालत येतो. त्याठिकाणहून रिक्षाद्वारे तो रविवार कारंजापर्यंत व तेथून पुन्हा दुसरी रिक्षा करून मनपा कार्यालयापर्यंत पोहोचतो. यासाठी त्याला साधारण शंभर रूपये खर्चही येतो.
कोणाला कॅलेन्डर पाहिजे असल्यास संपर्काचे आवाहन
अंध असल्यामुळे जगताना ब-याच अडचणी येतात, परंतु समाजातील सकारात्मक विचारांच्या लोकांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही उर्जा व जगण्याचे बळ मिळते, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरने व्यक्त केली. कोणाला कॅलेन्डर पाहिजे असल्यास त्याने ७३८७४२४२८८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.