नाशिक / सुरगाणा : संतप्त जमावाने आरोप करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत मारझोड करून आरोग्य केंद्राची तोडफोड केली. आरोग्य केंद्राच्या तोडफोडीनंतर मनखेडला तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
मनखेड (ता. सुरगाणा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीमध्ये शिकणारा गौरव विलास गायकवाड याला (ता.३) सकाळी शेतात जाताना सर्पदंश झाला. त्याला मनखेडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी संतोषकुमार आडे यांनी प्राथमिक उपचार करताना गौरवची प्रकृती गंभीर असल्याचे आढळल्याने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. उपचारासाठी नेताना गौरवचा वाटेत मृत्यू झाला.गायकवाड कुटुंबात गौरव एकुलता मुलगा असून, गौरवच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी काय केले पुढे वाचा..
लस दिली असती, तर गौरवचे प्राण वाचले असते..
गौरवचा उपचारापूर्वी वाटेत मृत्यू झाल्याचे समजताच स्थानिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. सर्पदंशावरील लस आरोग्य केंद्र उपलब्ध असताना ती गौरवला का दिली नाही? लस दिली असती, तर गौरवचे प्राण वाचले असते, असा आरोप संतप्त जमावाने करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत मारझोड करून आरोग्य केंद्राची तोडफोड केली. आरोग्य केंद्राच्या तोडफोडीनंतर मनखेडला तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम
तहसीलदार विजय सूर्यवंशी, कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, जिल्हा अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, योगेश वार्डे, मोहन गांगुर्डे, एन. डी. गावित, सुनील भोये आदींनी गावात भेट दिली. स्थानिकांना शांतता राखण्याची विनंती केली. वाघमारे यांनी पाहणी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी दिली.
दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित
मनखेड आरोग्य केंद्रात सर्पदंश झाल्यावर गौरवला आणले असताना दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. एक वैद्यकीय अधिकारी बाळांतपण करत होते. एक वैद्यकीय अधिकारी सर्पदंश रुग्णाची तपासणी करून उपचार करत होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून पाठविण्यात आले. यादरम्यान, नातेवाइकांनी रुग्णास कंदमूळ खाऊ घातले, असे वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
...तर खपवून घेतले जाणार नाही,
वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवा देण्यासाठी कुटुंबासमवेत मनखेडमध्ये राहत असल्याचे सांगून कायदा कुणी हातात घेऊन दबाव आणत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. -प्रफुल्ल वसावे,अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी महासंघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.