नाशिक : कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील तरुण शेतकरी बापू दिगंबर कदम (वय 25) याने शेतीच्या कर्जाला कंटाळून सोमवारी (ता. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास कोरोझॉन व नुऑन ही दोन विषारी औषधे प्राशन करून द्राक्षबागेतच आत्महत्या केल्याची घटना घडली.
अशी आहे घटना
सोमवारी रात्री जेवणानंतर बापू दिगंबर कदम (वय 25) हा तरुण द्राक्षबागेत गेला होता. येथील गट क्रमांक 308 मधील शेतीवर त्याचे वडील दिगंबर वामन कदम यांच्या नावे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पाच लाख रुपये पीककर्ज व मध्यम मुदतीचे द्राक्ष कर्ज आहे. शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत आणणाऱ्या इतर बाबींप्रमाणेच यंदा कोरोनामुळे व्यापारी द्राक्षबाग घ्यायला तयार होईनात. त्यामुळे अखेर बेदाणा बनविण्यासाठी पाच रुपये किलो दराने व्यापाऱ्याला बाग दिली. त्या वेळी बेदाणा विकल्यावर हप्त्याहप्त्याने पैसे देण्याबाबत बोलणे झालेले होते. त्यानुसार व्यापाऱ्याने बागेतून द्राक्षे नेली; परंतु त्यानंतर आता खरड छाटणीसाठीही पैसे नाहीत. बापू कदम यांचा भाऊ दत्तू लष्करात असून, अहमदाबाद (गुजरात) येथे सीमेवर तैनात आहे. त्यामुळे वयोवृद्ध आई-वडिलांची जबाबदारीही बापूवरच होती. खाली झालेल्या द्राक्षबागेला त्याने रात्री साडेदहापर्यंत पाणी दिले. त्यानंतर शेतातच असलेल्या घरातून कोरोझॉन-250 व नुऑन 1 लिटर घेऊन रात्री साडेअकराच्या सुमारास द्राक्षबागेत पांघरूण, कांबळ घेऊन जाऊन शेताच्या मध्यभागी विषारी औषध प्राशन करून त्याने आत्महत्या केली.
तत्पूर्वी त्याने मोबाईलही स्विचऑफ करून ठेवलेला आढळला. मंगळवारी (ता. 14) सकाळी आठपर्यंत तो घरात न आल्याने आईने शोधाशोध सुरू केली, तेव्हा बागेतच मृतदेहासह औषधाच्या बाटल्या, कांबळ, मोबाईल आढळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.