Dhule Crime News : येथील देवपूरमधील लक्ष्मीनगरात मंगळवारी (ता. २२) भरदुपारी चोरट्यांनी १५ तोळे सोन्याची लूट करत धाडसी चोरी केली. शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडल्याने धुळेकर भयभीत आहेत.
लक्ष्मीनगरातून रोकड, दागदागिने आणि जर्मनीचे चलन ८० युरो व २० गिन्नाही चोरट्यांनी लंपास केले. घराची रेकी करत धाडसी चोरी केल्याचा पोलिसांचा कयास आहे. (15 tola gold stolen in Lakshmi Nagar Dhule Crime News)
नवरंग जलकुंभ, आयटीआयमागे लक्ष्मीनगर आहे. तेथे प्रभूधन नामक बंगल्यात रमेश हिरामण सावंत (वय ५७) वास्तव्यास आहेत. ते कन्हय्यालाल पतसंस्थेचे निवृत्त व्यवस्थापक आहेत. त्यांची पत्नी सुरेखा सावंत या महापालिकेत नगरसचिव विभागात लिपिक आहेत.
श्री. सावंत सुटीचे दिवस वगळता रोज सकाळी साडेदहा ते अकराला पत्नी सुरेखा यांना महापालिकेत सोडतात. नंतर दुपारी साडेबारे ते एकपर्यंत घरी येतात. या दिनक्रमाप्रमाणे श्री. सावंत मंगळवारी सकाळी अकराला महापालिकेत पत्नीला सोडण्यासाठी गेले. नंतर पाऊणला घरी आले.
घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांना चोरीची शंका आली. त्यांनी शेजारील लॉन्ड्रीचालकासोबत घराची पाहणी केली. त्या वेळी चोरट्यांनी कपाट, तिजोरी फोडून सोन्याचे दागदागिने, पूजेसाठीचे सोन्या-चांदीचे शिक्के, काही रोकड लंपास केल्याचे दिसून आले. तसेच जर्मनीचे चलनही चोरीस गेल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे श्री. सावंत यांच्या घरापासून काही अंतरावर सीसीटीव्ही आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र, सीसीटीव्हीत आपण नजरेत येणार नाही अशा पद्धतीने त्याची दिशा चोरट्यांनी फिरविली होती. त्यामुळे रेकी करून चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, उपनिरीक्षक राजेश इंदवे, सहाय्यक अधिकारी मिलिंद सोनवणे, हवालदार पंकज चव्हाण, एलसीबी पथकातील मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, शशी वाघ श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले.
श्वानाने उमरावनगरपर्यंतचा माग काढला. श्री. सावंत यांनी रात्री देवपूर पोलिस ठाण्यात साडेपाच हजारांची रोकड, जर्मनीच्या चलनाप्रमाणे सात हजार ८८० रुपये, सोन्याचे दागदागिने, चांदीचे शिक्के आदींसह एकूण चार लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद दिली.
महासंचालक सक्सेना धुळ्यात असूनही...
राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील दोन दिवस ‘इन्स्पेक्शन’साठी धुळे दौऱ्यावर असतानाही कॉटन मार्केटजवळ रविवारी मध्यरात्रीनंतर १८ लाखांची लूट, तर मंगळवारी दुपारी पंधरा तोळे सोने लुटीची घटना घडली. त्यामुळे पोलिसांसह कायद्याचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.