Dhule News : नाशिकहून बसमध्ये बसलेल्या डिलिव्हरी बॉयकडील सोने- चांदी दागिन्यांच्या पार्सल चोरीच्या घटनेची धुळे शहर पोलिस आणि एलसीबीच्या संयुक्त पथकाने उकल केली. यात थेट उत्तर प्रदेशातून दोन संशयितांना बेड्या ठोकल्या.
त्यांच्याकडून ४९ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व आठ लाखांची कार हस्तगत केली.
संयुक्त पथकाच्या यशस्वी कामगिरीची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मंगळवारी (ता. २७) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. तसेच संयुक्त पोलिस पथकाला दहा हजारांचे बक्षीस घोषित केले.(2 Suspects arrested from Uttar Pradesh Award to the Joint Police Team Dhule Crime News)
जय बजरंग कुरियरचा डिलिव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह सीकरवार (रा. काळबादेवी, मुंबई) हा १४ जूनला पहाटे साडेपाचला नाशिकहून निघाला. सोने-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन तो सकाळी साडेआठला धुळ्यात आला.
दरम्यान त्याला बसमध्ये झोप लागल्याने चोरट्यांनी दागदागिने पार्सलची बॅग नेली. त्यात ६४ लाख ८० हजार २५३ रुपयांचे दागिने होते. याबाबत विष्णूसिंह निनुआ सीकरवार (रा. काळबादेवी, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तपासात नावे निष्पन्न
सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, विजय शिरसाट, कुंदन पटाईत, महेश मोरे, मनीष सोनगीरे यांनी नाशिक, धुळे येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित मनोजकुमार राजेंद्रसिंग सिसोदिया (रा. आग्रा, उत्तर प्रदेश), मयंककुमार आनंदकुमार गुप्ता (रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश), पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपूत (रा. धोलपूर, राजस्थान) व राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया (रा. आग्रा, उत्तर प्रदेश) यांची नावे निष्पन्न केली.
संशयितांच्या शोधार्थ एलसीबी व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये जात संशयितांचा कसून शोध घेतला. चौघांपैकी पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपूत याला ताब्यात घेतले.
चहात गुंगीचे औषध
संशयिताकडून पथकाने चोरीच्या मुद्देमालापैकी ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन किलो ४०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांची किंमत ४९ लाख ३६ हजार ७१५ रुपये आहे. तसेच चोरीकामी वापरलेली आठ लाखांची कार (यूपी ८३, एयू ९३३०), असा ५७ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासात राहुल सिसोदिया याने कुरिअर बॉय गोविंद सीकरवार याला चहामध्ये गुंगीकारक औषध पाजल्याने तो बसमध्ये गाढ झोपल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रकाश पाटील, विजय शिरसाट, योगेश चव्हाण, कुंदन पटाईत, पंकज खैरमोडे, मनीष सोनगीरे, महेश मोरे यांना परराज्यात पाठवून ही कारवाई केली.
संशयित पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपूत याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच, राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया याला धुळे येथे ताब्यात घेतले. तपास पथकास लागणारी सर्व तांत्रिक माहिती सायबर विभागाचे संजय पाटील व अमोल जाधव यांनी उपलब्ध करून दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डिलिव्हरी बॉयला गुंगीचे औषध
संशयितांनी नियोजनबद्धरीत्या किमती दागिन्यांची चोरी केली. डिलिव्हरी बॉय गोविंद सीकरवार याच्यावर लक्ष ठेवले. बसमध्ये
त्याच्या बाजूचेच तिकीट काढले. राहुल सिसोदिया याने गोविंद याला चहामधून गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे तो बसमध्ये गाढ झोपी गेला. जाग आल्यानंतर त्याला दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरी लक्षात येऊ नये म्हणून चोरट्यांनी बॅगेत वजनासाठी नारळ आणि पाण्याच्या दोन बाटल्या ठेवल्या. तथापि, संशयित राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया (रा. आग्रा, उत्तर प्रदेश) हा डिलिव्हरीचे काम करतो, असे पोलिस चौकशीत उघडकीस आले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.