Dhule Onion News: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केली आहे. या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यातबंदीचा थेट फटका गोरगरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
धुळे बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात क्विटंलला अचानक दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजीआहे. दरम्यान, १४ डिसेंबरपर्यंत कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार असल्याचे बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे. (2000 fall in price of onion dhule news)
नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटानंतरदेखील आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे धुळे बाजार समितीत अचानक कांद्याचे दर प्रतिक्विंटलला दीड ते दोन हजार रुपयांनी कोसळले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ डिसेंबरला सर्वाधिक सहा हजार ४७१ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. सर्वसाधारण दोन हजार ४७५, किमान ६००, तर कमाल तीन हजार २०० रुपये प्रतिक्विटंल दर मिळाला. ७ डिसेंबरला सहा हजार २३० क्विंटल आवक झाली. त्या वेळी कमीत कमी ५७५ ते जास्तीत जास्त तीन हजार ६५३ रुपये प्रतिक्विटंल भाव मिळाला.
तत्पूर्वी २३ नोव्हेंबरला पाच हजार ५८० क्विंटल आवक होती. तेव्हा ९७५ ते तीन हजार ४७५ व सर्वसाधारण दर दोन हजार ७५० रुपये क्विंटल होता. १ डिसेंबरला पाच हजार ८५९ क्विंटल आवक झाली. तेव्हापासून दरात घसरण सुरू झाली.
आज कांद्याला सर्वसाधारण दोन हजार ४०० रुपये भाव आहे. किरकोळ बाजारात कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. अवकाळी पाऊस, खराब हवामान यामुळे कांद्याचे उत्पादन यंदा घटण्याची भीती आहे. त्यातच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने तत्काळ हटविण्याची मागणी शेतकरी करत आहेत. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यातअंतर्गत प्रोत्साहन अनुदान लागू केल्याशिवाय निर्यात वाढून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चार दिवस कांदा खरेदी बंद
जिल्ह्यात अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणात झालेल्या बदल्यामुळे कांदा खरेदीदार असोसिएशनकडून कांदा खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बाजार समितीला पत्र दिले आहे. त्यामुळे ११ ते १४ डिसेंबरदरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असतील. १४ डिसेंबरला कामगार, कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आल्याने या दिवशी सर्वच प्रकारचे लिलाव, व्यवहार बंद राहणार असल्याचे बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.