Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने युद्धपातळीवर राज्यभरात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संवर्गाच्या नोंदी तपासणीचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी १२ कार्यालयांमध्ये नोंदी तपासणीचे कामकाज सुरू आहे.
यात आतापर्यंत चार लाखांहून अधिक कागदपत्रे तपासली गेली असून, सरासरी २७ हजारांहून अधिक नोंदी आढळल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संवर्गाच्या नोंदी तपासणीचे कामकाज होत आहे. ब्रिटिश काळापासून अर्थात १८२० पासूनचे रेकॉर्ड तपासले जात आहे. (27 thousand Kunbi Maratha records were found in Dhule news)
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यभरात ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही नोंदी तपासण्याच्या कामास गती देण्यात आली आहे.
पथकांची नियुक्ती
नोंदी तपासणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली आहे. पथके तहसील कार्यालय, खरेदी-नोंदी कार्यालय, भूमिअभिलेख, पालिका, महापालिका, पोलिस कार्यालय आदी विविध कार्यालयांसह शासकीय व खासगी शाळांमध्येही नोंदी तपासणीचे कामकाज सुरू आहे.
महापालिकेत तपासणी
महापालिकेत नोंदी तपासणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व जुने रेकॉर्ड तपासून त्यातील कुणबीसंदर्भात नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे, अभिलेख विभाग व जन्म-मृत्यू नोंद विभागाचे अभिलेखापाल कल्पना जाधव व त्यांचे सहकारी या कामकाजात गुंतले आहेत.
मनपातही जुने रेकॉर्ड असून, काही कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. जुने सर्व गठ्ठे काढून १९६७ पूर्वीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी, मनपा शाळांमधील प्रवेश रजिस्टर, शाळा सोडल्याचे दाखले, मालमत्ता कर नोंदी तपासण्यात येत आहेत. नोंदी आढळल्यानंतर त्या स्कॅन केल्या जात आहेत. तसेच दैनंदिन कामाचे विवरणपत्र वरिष्ठांना सादर केले जात आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनात नोंदी तपासणीचे कामकाज सुरू आहे.
जिल्ह्यातील शाळांना विविध सूचना
जिल्ह्यातील महापालिका, पालिका, खासगी मराठी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांना १९४८ पूर्वीचे, १९४८ ते १९६७ पर्यंत शाळेत दाखल झालेले कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जाती संवर्गनिहाय प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या तक्त्यात तयार करून पाठविण्याची सूचना आहे.
तसेच ज्या नमुना नंबरमध्ये या जाती संवर्गाची नोंद असेल, त्या पानाचे स्कॅनिंग करायचे असल्याने त्या ठिकाणी फ्लॅग लावणे, संबंधित माहिती प्राधान्याने पाठविण्याचीही सूचना आहे. जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर १९६७ पूर्वीच्या विद्यार्थी प्रवेश रजिस्टर (नमुना नं. १) नोंदी तपासून गुगल लिंकमध्ये माहिती भरून सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.