Dhule News : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १०६ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. पैकी ४५ योजना विविध तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्या आहेत.
तथापि, पहिल्या टप्प्यातील आदिवासी जमिनींवरील ४८ योजनांपैकी दहा योजनांच्या विहिरींचे काम न झाल्याने ब्रेक लागला आहे.(45 tap water supply scheme cancelled in district dhule news)
केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घराला नळाने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या योजनेतून ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४४९ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता दिली.
या योजनांची कामे सध्या सुरु आहेत. याशिवाय जलजीवन मिशनच्या टप्पा क्रमांक दोनसाठी आराखडे बनविण्यात आले. यात १०६ पाणीपुरवठा योजनांचा समावेश झाला. या पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश देण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, विविध तांत्रिक कारणांमुळे ४५ योजनांची कामे रद्द झाली आहेत.
कामे देतानाही अडचण
जिल्ह्यात मोठ्या संख्येने मंजूर असलेल्या योजनांची कामे करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे नोंदणी केलेले ठेकेदार नसल्याने एकेका ठेकेदाराला अनेक कामे देण्यात आली. यातून तोडगा काढण्यासाठी बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनाही दीड कोटी रुपयांपर्यंतची कामे देण्याचा निर्णय झाला.
शिवाय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील कामे त्यांच्याच मर्जीतील ठेकेदारांना मिळण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्यामुळे निविदा प्रक्रिया गतीने राबविण्यात आली नाही, अशी चर्चा लपून राहिली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सर्व मंजूर कामांचे टेंडर पूर्ण होणे अशक्य आहे.
उद्भवलेल्या विविध तांत्रिक अडचणींमुळे ४५ पाणीपुरवठा योजनांची कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आदिवासी जमिनीचा सातबारा नावावर नसल्याने जलजीवनच्या ४८ योजना रखडल्या होत्या. पैकी काही योजना आता मार्गी लागल्या आहेत. परंतु, आदिवासी जमिनीवरील दहा योजनांच्या विहिरींची कामे पूर्ण न झाल्याने या योजनांच्या कामांना ब्रेक लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.