Dhule Municipality News : शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा शहरात सर्रास वापर सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाला पुन्हा एकदा जाग आली आहे. गुरुवारी (ता. २३) पथकाने दोन प्लॅस्टिक दुकानांतून बंदी असलेला तब्बल साधारण पाच टन प्लॅस्टिक माल जप्त केला.
तसेच संबंधित दुकानदारांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईने प्लॅस्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले. (5 tons of plastic seized by municipality from shop dhule news)
त्यामुळे पुन्हा काही दिवस विशेषतः प्लॅस्टिक कॅरीबॅग वापराला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील प्लॅस्टिक विक्री, वापरावर बंदी आहे. त्यातही प्रामुख्याने सिंगल यूज प्लॅस्टिकला बंदी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेकडून कारवाई नव्हती, त्यामुळे शहरात सर्वत्र सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांसह इतर वस्तूंची सर्रास विक्री व वापर होताना पाहायला मिळत आहे.
विशेषतः प्लॅस्टिक कॅरीबॅग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. छोटे-मोठे विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते अशा अनेक विक्रेत्यांकडून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्यांतूनच माल दिला जातो. ग्राहकदेखील बाजारात सहज प्लॅस्टिक पिशवी उपलब्ध होते, म्हणून कापडी अथवा इतर नियमित वापरातली पिशवी सोबत नेत नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होताना दिसते.
दरम्यान, महापिलकेच्या पथकाला गुरुवारी पुन्हा कारवाईसाठी जाग आली. या कारवाईत दोन दुकानदारांवर पथकाने कारवाई केली. शहरातील ऊस गल्लीतील हरे कृष्णा प्लॅस्टिक व सुनील प्लॅस्टिक या दुकानांवर महापालिकेचे कारवाई पथक गेले असता बंदी घातलेला प्लॅस्टिक माल आढळून आला.
या दोन्ही दुकानांतून पथकाने साधारण पाच टन प्लॅस्टिक माल जप्त केला. शिवाय एका दुकानदाराकडून २५ हजार, तर दुसऱ्या दुकानदाराकडून दहा हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिकबंदी पथकप्रमुख लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, प्रमोद चव्हाण, साईनाथ वाघ, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, रूपेश पवार, आसिफ बेग, चेतन अहिरे, मनीष आघाव, रतन निरगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कापडी पिशवी वापरा
दरम्यान, शहरातील विक्रेते व नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री अथवा वापर करू नये. कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संतुलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.