Dhule News : कमी पर्जन्यमानामुळे काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे (ता. धुळे) येथील दहा हजारांवर ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे आवर्तनातून निमडाळेतील शिपाई तलाव भरून घेतल्याने उन्हाळ्यातील निमडाळेकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यातून ही कार्यवाही झाल्याचे म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. ११) तेथे जलपूजन केले. (50 percent water storage in Sepai lake dhule news)
यंदा कमी पावसामुळे निमडाळे ग्रामस्थांना तीन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांना चक्क २० ते २५ दिवसांनंतर पाणी मिळत होते. याबाबत निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे, उपसरपंच नितीन सूर्यवंशी, भाजपचे तालुका सरचिटणीस शरद पाटील व ग्रामस्थांनी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे कैफियत मांडली.
त्याची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. भामरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. तीत अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
त्यावर खासदार डॉ. भामरे यांनी तातडीने अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळेतील शिपाई तलाव भरण्याची कार्यवाही करावी व निमडाळेकरांना पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी सूचना केली.
अखेर आवर्तनाचे निर्देश
या सूचनांनुसार जिल्हाधिकारी गोयल यांनी ३१ जानेवारीला अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे निमडाळेचा शिपाई तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार त्याच दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. ४ फेब्रुवारीला निमडाळे येथील शिपाई तलावात पाणी पोचले.
८ फेब्रुवारीला आवर्तन बंद झाले. त्यातून निमडाळेच्या शिपाई तलावात सुमारे ४० ते ५० टक्के साठा झाला असून, हा साठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या जलसाठ्यामुळे पावसाळ्यापर्यंत निमडाळेकरांची तहान भागणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पदाधिकारी-ग्रामस्थांकडून जलपूजन
दरम्यान, शिपाई तलावात जलसाठा झाल्यानंतर रविवारी (ता. ११) भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष रवंदळे-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पक्षाचे तालुका सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, पदवीधर आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र निकम.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विद्याधर पाटील, निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे, केतन सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी जलपूजन केले. या वेळी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल घोडे, कनिष्ठ अभियंता बी. एस. राणे, वैभव गाडेकर, गिरीश महाले, तेजस बडोगे, जयेश सगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.