Dhule Crime News : साक्री येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वती नगर येथे रात्री 11 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ घाव घेत दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले आहे. ()
दरोड्यांसोबतच तरुणीचे अपहरण केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासोबतच तरुणीला सुरक्षित परत आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. घटनेबाबत ज्योत्स्ना निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
दहीवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. ज्योत्स्ना पाटील यांचे पती निलेश पाटील काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची भाची निशा मोठाभाऊ शेवाळे हिला सोबत बोलावले होते.
दरोेडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर झटापट करत, तोंड हाताने दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रांचा धाक दाखवत अंगावरील कानातील सोन्याचे काप, पट्टीची माळ, मनी मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण असे एकूण 88 हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी पोलिसांनी सांगितले.
तसेच वरील ऐवज हिसकावल्यानंतर हात, पाय बांधून, तोंडात बोळा कोंबून मागील रूममध्ये लोटले व भाची निशा शेवाळे हिला घेवून पळून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर काही वेळानंतर ज्योत्स्ना पाटील यांनी कसेबसे हात सोडवून खिडकीची काच उघडत आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाश्यांना सदर प्रकार लक्षात आला व त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. यानंतर श्वान पथक, ठसे तज्ञ यांना रात्रीच बोलावून नमुने घेण्यात आले व शहरातून बाहेर पडणाऱ्या आजूबाजूला सर्व रस्त्यांनी दरोडेखोराचा शोध सुरू करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पिंपळनेरचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हे देखील पथकासह रात्रीच घटनास्थळी पोहोचत त्यांनी देखील शोध सुरू केला. पोलिसांच्या पथकासह शिवसेना तालकाप्रमुख पंकज मराठे यांच्यासह स्थानिक सामजिक कार्यकर्त्यांनी देखील रात्रीच स्वताच्या वाहनांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील सकाळी लवकर घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी देखील सर्व माहिती घेवून लगतच्या जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांशी बोलत तपास सुरू केला आहे. दरम्यान सदर घटनेत दरोड्या सोबतच तरुणीचे अपहरण देखील करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी देखील यातील गांभीर्य लक्षात घेत लागलीच शोध मोहीम सुरू करत तपासाला गती दिली आहे.
''दरोड्यासोबतच तरुणीच्या अपहरणाची घटना अतिशय गंभीर असून, पोलिसांनी सर्व शक्यतांचा विचार करून तपासला गती दिली आहे. काही सीसीटिव्ही फुटेज व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व बाजूकडील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
लगतच्या जिल्ह्यातील पोलिसांना देखील घटनेची माहिती देत तपास करण्यात येत आहे. पोलिसांची चार पथके शोध घेत असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासोबतच तरुणीला सुरक्षित परत आणण्याचे पोलिसांचे युदधपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.''- साजन सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, साक्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.