निमगूळ : दोंडाईचा येथील ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाली असून, दोंडाईचा पोलिस ठाण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रांमध्ये शेतकरी, अशिक्षित अशा खातेदारांचे फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कौतिक हरी माळी (वय ४५ रा.रामी ता . शिंदखेडा), यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की स्टेट बँक ऑफ इंडिया दोंडाईचा शाखेजवळ ग्राहक सेवक केंद्रात किरणकुमार हरीश्चंद्र पवार, शीतल गोसावी (रा. नंदुरबार चौफुली दोंडाईचा) यांच्याकडे बँकेचा व्यवहार करण्यासाठी ३ फेब्रुवारीला सात हजार रुपये भरण्यासाठी दिले होते. तशी पावती ग्राहक सेवा केंद्रातून मला मिळाली. दहा दिवसानंतर पासबुक प्रिंट केले असता भरलेली रक्कम जमा न झाल्याचे निदर्शनास आले. ग्राहक सेवा केंद्रातील शीतल गोसावी यांना यासंदर्भात जाब विचारला असता तुमचे पैसे ऑनलाइनमुळे अडकले असल्याचे सांगितले. तीन दिवसानंतर पुन्हा ग्राहक सेवा केंद्रात रकमेबाबत चौकशी करण्यासाठी गेलो तेव्हापासून केंद्र बंद होते. संबंधित केंद्र चालक कोठारी पार्कजवळ भेटले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्राहक सेवा केंद्रात अनेक खातेदारांची फसवणूक झाली असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दोंडाईचा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिनेश मोरे करत आहेत.
''दोंडाईचा शहरातील ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या खातेदारांनी या ग्राहक केंद्रावर व्यवहार केले असतील त्यांनी बँकेत जाऊन खात्याचा तपशील खात्री करून घ्यावा. व फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यास दोंडाईचा पोलिसांशी संपर्क करावा.'' - दिनेश मोरे, उपनिरीक्षक दोंडाईचा पोलिस ठाणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.