Prakash Ambedkar : एकीकडे देशात मणिपूरसारख्या राज्यात लोकांची मुंडके छाटली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे छोट्या-छोट्या कामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करीत फिरतात. माझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही, ही कार्यपद्धती लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
भाजप, आरएसएसवाले मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी असे जातीच्या नावाने सैन्य उभे करीत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सावध व्हा, जाती-धर्माच्या नावाने डोके फिरू देऊ नका अन्यथा देशात मणिपूर, पॅलेस्टाइनसारखी स्थिती उभी राहील, असा इशारा देत मोदींना हटवा आणि लोकशाही वाचवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. ( Adv Prakash Ambedkar statement about caste religion dhule news)
वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आघाडीतर्फे धुळ्यात गुरुवारी (ता. २६) सायंकाळी साक्री रोड परिसरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर आदिवासी एल्गार सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, संघटक शंकर खरात, उपाध्यक्ष रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संतोष जाधव, साईनाथ बर्डे, महेश औताडे, आदिवासी समाज संघाचे महेंद्र माळी, एकलव्य सेनेचे राज साळवे, दिलीप मोहिते, विनोद भोसले, ह.भ.प. माईसाहेब यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, की भाजप-आरएसएसचे हे फसवे राजकारण आहे, याला बळी पडू नका. जी-२० परिषदेसाठी तब्बल एक लाख १३ हजार कोटी रुपये खर्च झाला. यातून काहीही मिळाले नाही. एवढ्या खर्चात देशातील दारिद्र्य संपले असते; पण केवळ मोदी जगाचे नेते आहेत, हे दाखविण्यासाठी एवढा खर्च करण्यात आला.
या जी-२० परिषदेतून उलट जगासमोर पंतप्रधानांच्या माध्यमातून जगासमोर देशाची इज्जत गेली, अशी टीका ॲड. आंबेडकर यांनी केली. मोदी सरकार हे पब्लिसिटी सरकार आहे, माझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही, हेच ते दाखवितात, हे लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे सावध व्हा, असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला.
तर लोकशाही नांदेल
लोकशाहीत राजेशाहीचे अवशेष असल्याने सर्वसामान्य जनतेला नागविण्याचे काम सुरू आहे. ही राजेशाही, जातीयवाद कायमचा गाडला तरच देशात लोकशाही नांदेल. जातीला नव्हे, तर प्रश्नाला प्राधान्य द्यावे लागेल. निजामी मराठा, गरीब मराठ्याला आरक्षण देणार नाही, हे आपण वारंवार सांगतोय, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
‘पेसा’मुळे अधिकार गेला
संविधानातील अनुच्छेद ५, ६ नुसार आदिवासींना स्वतःचे राज्य दिले गेले. मात्र, पेसा कायद्याने ही तरतूद नाकारली गेली. आज आदिवासीच विस्थापित होतो. हा लढा वर्चस्वाचा, मानसिकतेचा असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. प्रा. चव्हाण म्हणाले, की ‘वोट हमारा-राज हमारा’ असेच आता चालेल. ॲड. आंबेडकर, वंचितला बळ द्या. इतरही पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
पुन्हा नोटबंदीसारखी स्थिती
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकातून ‘इंडिया’ऐवजी भारत करण्याचा संदर्भ देत ॲड. आंबेडकर यांनी आपल्या खिशातील नोटांवर इंडिया शब्द असतो, तोही नंतर बदलला जाईल. परिणामी शब्दशः नोटबंदी नाही; पण तशीच स्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.