Dhule News : महसूल विभागाच्या योजनांची माहिती शहरी व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी आता शहरातील सात महाविद्यालयांशी धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सोमवारी (ता. ९) करार केला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांसाठी हा करार आहे.(Agreement between Sub Divisional Officer Colleges dhule news )
धुळ्यातील उपविभागीय कार्यालयात झालेल्या करारप्रसंगी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, शहर तहसीलदार विनोद पाटील, ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार संजय शिंदे, जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही पाटील, उपप्राचार्य के. एस. बोरसे, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, पालेशा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले, गंगामाई महाविद्यालयाचे डॉ. एस. आर. पाटील, अभय महिला महाविद्यालयाचे डॉ. एस. जी. बाविस्कर, एसएनडीटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डॉ. डी. झेड चौधरी आदी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी जाधव म्हणाले, की शासनाशी करार झालेले धुळे शहरातील महाराष्ट्रातील एक नामांकित व शैक्षणिक नेतृत्व करणारी ही महाविद्यालये आहेत. उत्कृष्टतेचा व समाजविकासाचा ध्यास तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचविणे हे ‘मिशन’ म्हणून प्रारंभापासूनच संस्था व महाविद्यालयाने स्वीकारले आहे.
स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात भर पडत असून, प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडविण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालयांनी समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच पुढाकार घेऊन लोकांच्या समस्या दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
त्यामुळे आता शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील पहिलाच पायलट उपक्रम असून, यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय योजनांच्या कार्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसहभागदेखील वाढणार आहे.
विद्यार्थ्यांना अनुभव मिळेल
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सरकारी कामकाजाची ओळख होईल, अनुभव मिळेल. तसेच याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार असून, प्रशासन व नागरिक जवळ येण्यास मदत होणार असल्याचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील म्हणाले.
असा आहे करार
महसूल विभागाच्या योजना विद्यार्थ्यांमार्फत लोकांपर्यंत पोचविणे, शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांबाबत प्रशिक्षणाचे आयोजन, संवाद, पथनाट्य, समाजमाध्यमे व जनजागृतीपर उपक्रमांतून अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देणे, महसूल विभागाच्या सर्व योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचविणाऱ्या महाविद्यालयास व प्रत्येक महाविद्यालयातील किमान तीन विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल, महाविद्यालय व विद्यार्थी यांच्या या उपक्रमात सहभागी कार्याची दखल घेऊन निवड करण्यासाठीची निवड समिती महसूल विभाग ठरवतील व त्यांचा निर्णय बंधनकारक राहील.
अटी व शर्ती
ई-हक्क प्रणाली एका विद्यार्थ्याने किमान पाच व्यक्तींची नोंद करावी, एका विद्यार्थ्याने किमान २० लोकांची पीक पाहणी नोंदवावी,
ई-चावडीद्वारे एका विद्यार्थ्याने किमान दहा लोकांना नोंदणीकृत करावे, सलोखा योजना एका विद्यार्थ्याने किमान एक प्रकरण नोंदवावे, लक्ष्मी मुक्ती योजनेत एका विद्यार्थ्याने किमान दहा लोकांची नोंदणी करावी, एका विद्यार्थ्याने किमान पाच नवीन मतदार नोंदणी करावी, एका विद्यार्थ्याने स्वतःचे किमान दोन दाखले तयार करून घ्यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.