धुळे : महापालिका क्षेत्रात गतीने विस्तार होणाऱ्या देवपूर भागात समाजकंटक नरेश गवळी, आकाश पानथरे, अविनाश परदेशी व साथीदारांनी अनेक दिवसांपासून धुडगूस घातला आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
मात्र, वेगवेगळ्या गुन्ह्यांत जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा अशांतता निर्माण करतात. असे असताना गुरुवारी (ता. २५) दुपारी दोननंतर झालेल्या सशस्त्र गँगवॉरमध्ये देवपूरमधील नगाव बारी परिसरात पुन्हा अशांतता निर्माण झाली.
या घटनेची पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत समाजकंटकांवर कठोर कारवाईचा आदेश देवपूर व पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यास दिला आहे. (Armed gangwar in Deopur SP will take strict action Dhule Crime Latest marathi news)
नगाव बारी परिसरातील गँगवॉरमध्ये समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्यासह रिव्हॉलव्हरचा वापर केला. हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यास पोलिसांनी दुजोरा दिला नाही. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात रात्री साडेआठनंतर परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला.
सोन्या चव्हाणची फिर्याद
नगाव बारी परिसरातील अष्टकोनी ओटा येथे वास्तव्यास असलेला वाहनचालक योगेश ऊर्फ सोन्या राजेंद्र चव्हाण (वय ३०) याने फिर्यादीत म्हटले आहे, की माझ्या वहिनीची महिन्यापूर्वी संशयित अविनाश परदेशी याने छेड काढली होती. त्यामुळे वहिनीने संशयित परदेशी याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली.
नंतर नरेश कांतिलाल गवळी (रा. नगावबारी चौफुली), मुन्ना हनुमंत वाडिले (रा. जुने धुळे), आकाश पानथरे (प्रभागनगर, देवपूर), ऋषभ शिरसाट (रा. नगावबारी), निरज गिरासे (रा. फॉरेस्ट कॉलनी), अविनाश परदेशी (रा. विटाभट्टी), अक्षय जोशी (रा. विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर), पंकज बन्सीलाल परदेशी (रा. विटाभट्टी) यांनी मला व कुटुंबाला वेळोवेळी धमकी दिली व शिवीगाळ केली.
दोन ते तीन दिवसांपूर्वी अष्टकोनी ओटा व्हॉटस्ॲप ग्रुपवर नरेश गवळी व शुभम मोरे याच्या संभाषणाची क्लीप व्हायरल झाली. त्यात गवळी याने माझ्या कुटुंबातील महिलांबाबत अश्लिल भाष्य केल्याचे समोर आले. गुरुवारी दुपारी एकला दत्तमंदिर चौकात गवळी भेटला. त्याला माझ्या कुटुंबातील महिलांबाबत अश्लिल का बोलला, असा जाब विचारला. त्याने शिविगाळ करत अष्टकोनी ओटा येथे येतो, असे सांगितले व गवळी निघून गेला.
दुपारी दोनला नरेश गवळी मुन्ना वाडिले, आकाश पानथरे, ऋषभ शिरसाट, निरज गिरासे, अविनाश परदेशी, अक्षय जोशी, पंकज परदेशी यांच्यासह अष्टकोन ओटा येथे माझ्या घराजवळ आला. त्याने शिवीगाळ करत माझ्या घरात घुसून कॉलर पकडून घराबाहेर काढले. त्यांनी मला मारहाण केली.
आकाश पानथरे याने कोयता काढून गळ्यावर वार केला, पण मी तो चुकविला. घराजवळील नागरिकांनी माझी मारहाण करणाऱ्यांपासून सुटका केली. नागरिकांची गर्दी झाल्यावर संशयित पळाले.
तेव्हा पानथरे विटांच्या अडथळ्यामुळे पडला व जखमी झाला, अशा आशयाची फिर्याद सोन्या चव्हाण याने दिल्याने संशयित गवळी, वाडिले, पानथरे, शिरसाट, गिरासे, अविनाश परदेशी, अक्षय जोशी, पंकज परदेशी या संशयित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पानथरे याची तक्रार
संशयित आकाश पानथरे (वय २८) याने फिर्यादीत म्हटले आहे, की जीटीपी स्टॉपवरून निरज गिरासेसोबत दुचाकीने घराकडे जात असताना, ऋषभ शिरसाट याने दुपारी दोनला अष्टकोनी ओटा येथे सोडून दे, अशी विनंती केली.
तेथे गेल्यावर अमोल मराठे, प्रफुल्ल भोई, हरीश गिरासे, सोनू धोबी, शुभम देशमुख, जंब्या नरोटे, शुभम भामरे, गणेश जाधव आदींनी कोयता व चॉपरने मला मारहाण केली. नरेश गवळी याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार या संशयित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
दगडफेक, रिव्हॉल्व्हर उगारली
दोन गटांमधील हाणामारीवेळी काही रहिवाशांनी समाजकंटकांना पळवून लावण्यासाठी दगडफेक केली, तसेच एका संशयिताने दहशत निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर काढली. समाजकंटकांवर वचक नसल्याने व त्यांच्यावर देवपूर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई न झाल्याने त्यांचा धुडगूस सुरूच आहे.
पूर्वी या समाजकंटकांवर कारवाईबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. तो दुर्लक्षित ठेवण्यात आला. तसेच गवळी, पानथरे, परदेशीच्या हद्दपारीचा प्रस्तावही पडून आहे. त्यामुळे ते मुजोर झाले व देवपूरमध्ये अशांततेची स्थिती कायम असल्याचे नागरिक सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.