Dhule Crime News : तेहेतीस कुळांची कुलस्वामिनी असलेल्या पेडकाईदेवी (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास मंदिराच्या आवारातील पूजेचे दुकान फोडण्यासाठी आलेल्या आठ जणांविरोधात रात्री उशिरा शिंदखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ताब्यात असलेल्या सर्व संशयितांना सीआरपीसी १४१ प्रमाणे नोटीस देऊन सोडून दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Attempted theft in Pedkai Devi temple premises Dhule Crime News)
चोरीचा प्रयत्न नसून गुप्तधन काढण्यासाठी संशयित आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गालगत असलेल्या डोंगरावर पेडकाईदेवीचे भव्य मंदिर आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास वैद्यनाथ पेढेवाला याला मंदिराच्या परिसरात संशयित दिसल्याने त्याने साळवे गावातील ग्रामस्थांना फोन केला.
ग्रामस्थ गेले असता पेडकाईदेवी मंदिराचा मुख्य पुजारी किशोर साहेबराव गुरव (रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा), त्यांचा व्याही विजय गजानन गुरव (रा. कामनाथ महादेव मंदिराजवळ, नंदुरबार), प्रकाश फकिरा सोनवणे (रा. बुरझड, ता.जि. धुळे), जमल्या बेस्ता वळवी (रा. नवागाम, ता. शहादा, जि. नंदुरबार, विनोद रामपदारथ जयस्वाल (रा. देवानंद अभावा गाम, सुरत), अशोककुमार शिवंभर पटेल (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, भतार, सुरत), गणेश आमश्या वसावे (रा. मांजरे, ता.जि. नंदुरबार) व नितीन रमेश धुमाळ (रा. डाबरी, दोंडाईचा) मंदिराच्या आवारात चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सापडले.
ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले आणि सर्व संशयितांना शिंदखेडा पोलिस ठाण्यात आणले. शळिकांत पंडित बोरसे (वय ४८, व्यवसाय- पूजासाहित्य दुकान, रा. साळवे) यांनी फिर्याद दिल्यावरून आठ संशयितांविरोधात चोरीचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.
चोरीचा प्रयत्न की गुप्तधन तर्कवितर्क!
पेडकाईदेवी मंदिराचा मुख्य पुजारी किशोर गुरव याच्यासह आठ जण संशयितरीत्या मंदिराच्या आवारात फिरताना ग्रामस्थांना सापडणे, पेडकाईदेवीच्या मुख्य मंदिराच्या मागे पूर्वी ‘पेडका’ म्हणून गाव होते.
तेथे मारुतीचे पुरातन मंदिर असून, तेथे गुप्तधन असल्याचे बोलले जात असल्याने तेथे यापूर्वी गुप्तधन काढण्याचा प्रयत्न झाला आहे. तसाच प्रकार बुधवारी रात्री होता का, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे तो प्रयत्न फसला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यापूर्वी दोन वेळा दानपेटीची चोरी
गेल्या तीन वर्षांत पेडकाईदेवी मंदिराच्या दानपेटीची दोन वेळा चोरी झाली असून, पुजारी किशोर गुरव याने शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या चोरीचाही तपास होणे गरजेचे आहे. बुधवारच्या घटनेवरून ‘कुंपणच शेत खाते’ असा प्रकार उघड होऊ शकतो.
गुन्ह्यात वापरलेले वाहन गेले कुठे!
पुजारी किशोर गुरव याने बुधवारी दुपारी चिमठाणे येथील एका कापड दुकानातून सव्वादोन मीटर जाड मदरा (लाल कापड) घेतले का? जर संशयिताचा चोरीचा उद्देश होता तर लाल कपड्याची गरज कशाला? पेडकाईदेवी मंदिराचा मुकुट सोन्याचा असल्याने तो चोरण्याचा उद्देश चोरट्यांचा होता का? गुनह्यात चोरट्यांनी अर्टिगा चारचाकी वाहनाचा वापर केलेला आहे. त्या वाहनात गुप्तधन काढण्यासाठी जादूटोण्याचे साहित्य होते का, त्याचाही तपास नूतन पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.