Nandurbar Unseasonal Rain Damage : काकर्दे खुर्द, काकर्दे दिगर, हिंगणी, तोरखेडा, अभाणपूर, कोंढावळ, खापरखेडा (ता. शहादा) परिसरास गुरुवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह सोसाट्याचा वारा तसेच ढगफुटीसदृश मुसळधार अवकाळी पावसासोबत जोरदार वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकरातील फळबागांचे नुकसान झाले. (banana and papaya crop damage due to unseasonal rain in shahada taluka nandurbar news)
खासकरून केळी, पपई, हरभरा, टोमॅटो, डांगरमळ्यांचे मोठे नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. महसूल व कृषी विभागाने परिसरातील शेत शिवारात नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर, काकर्दे खुर्द, हिंगणी, तोरखेडा, अभणपूर, खापरखेडा, कोंढावळ परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा सुमारे अर्धा तास पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी, पपई अक्षरशः आडवी पडली असून, लागलेली फळे जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तर डांगरमळे, हरभरा, भाजीपाला आदीसह शेती पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या पावसाने आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलं आणि अवकाळीने रडवलं अशी गत झाली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा नैसर्गिक व आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व महसूल विभागाने निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काकर्दे खुर्द, दिगर शिवारात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्यासह रुद्ररूप धारण केले. पावसासह वाऱ्याच्या तडाख्याने केळी, पपई या पिकांचे झाड पूर्णतः आडवी पडली होती. यामुळे शेतात फळांचे खच पडले होते. पावसामुळे परिसरातील नदी, नाले, केटिवेअर भरले आहेत.
हवेमुळे झाडे उन्मळून पडली
पावसापेक्षा प्रचंड असा हवेचा जोर असल्याने शेती शिवारात जाणाऱ्या रस्त्यावर झाडे उन्मळून पडली, तर वीज वितरण कंपनीचे अनेक ठिकाणी तार व खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले.
शेती शिवारात हवेचा मोठ्या प्रमाणावर जोर असल्याने अनेक ठिकाणचे झाड उन्मळून पडल्यामुळे कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांना शेती शिवारात जाताना अडचणींचा सामना करावा लागला.
''पावसामुळे केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पिकांसाठी शेतकरी लाखो रुपये खर्च करतो. अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे परिसरात शेकडो एकर केळी, पपई जमीनदोस्त झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तो मिळावा तसेच महसूल व कृषी विभागाने पंचनामे सरसकट करावेत व नुकसानभरपाई द्यावी.''-बापू मराठे, शेतकरी, काकर्दे खुर्द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.