नंदुरबार : राज्यातील प्रत्येक बंजारा तांड्याला महसुली दर्जा देण्यासाठी व स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून, ही समिती बंजारा लमाणतांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करून घेणे या अनुषंगाने कारवाई करणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Banjara tandas in state will get revenue status Success to demand of India Banjara Kranti Dal Nandurbar News)
सोमवारी (ता. ५) मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा, लमाणतांडा समृद्धी योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली. वरील बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या योजनेच्या माध्यमातून तांड्यात पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य, पथदीप, गटार, अंतर्गत रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी किमान २५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक तांड्याला उपलब्ध होणार आहे. यामुळे संत सेवालाल महाराज बंजारा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या तांड्यांना संजीवनी मिळणार आहे.
या प्रस्तावित योजनेला राज्य शासनाची मान्यता मिळावी यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
तसेच बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, कार्याध्यक्ष मधुकर राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भूषण पवार, महासचिव शरद राठोड, महिला आघाडीच्या पूजा राठोड, डॉ. गणेश चव्हाण, रामसिंग राठोड, शिवाजी चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला आश्वासित केले होते.
नुकतेच २५ जानेवारीला मुंबई येथे बंजारा क्रांती दलासह विविध सहा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले होते.
त्या वेळी प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी राज्यातील पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी व वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेच्या धर्तीवर संत सेवालाल महाराज तांडा सुधार योजना लागू करण्याची मागणी केली होती.
महायुतीकडून बंजारा समाजाला न्याय
जामनेर तालुक्यात बंजारा लभाना नायकडा गोदरी महाकुंभ झाला होता. त्याचे आयोजन सचिव आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनीसुद्धा शासनाला वेळोवेळी बंजारा समाजाच्या व्यथा समजावून सांगितल्या होत्या.
हिवाळी अधिवेनात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य निलय नाईक यांनीदेखील राज्यातील तांड्यांना महसूल दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात याव्यात, यासाठी लक्षवेधी मांडली होती.
त्याची दखल घेत महायुती सरकारने बंजारा समाजाला न्याय दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे बंजारा समाजाने आभार मानले.
या निर्णयाचा श्रावण चव्हाण, जयंती राठोड, भावेश पवार, युवराज चव्हाण, प्रेम चव्हाण, चैत्राम राठोड, जितू पवार, रणजित पवार, पुरुषोत्तम चव्हाण, देवा चव्हाण, रणजित चव्हाण, शिवाजी चव्हाण, बदुलाल राठोड, पिंटू बंजारा, किसन पवार, डॉ. साईदास चव्हाण, राहुल राठोड यासह राज्यातील संपूर्ण बंजारा समाजाने या निर्णयाचा जल्लोषात केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.