Dhule Crime : साक्री शहरासह तालुक्यात आता चोऱ्यांचे प्रमाण परत वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. आता तर चोरट्यांनी चक्क बिअर शॉपीकडे मोर्चा वळविला असून, साक्री-नवापूर महामार्गावरील कावठे शिवारात असलेल्या हिरा कमल बिअर शॉपी फोडून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांची बिअर आणि वाइन चोरून नेली. (Dhule Crime)
त्यालगतच असलेल्या एका शेतातून शेतकऱ्याचा नवा रोटाव्हेटरदेखील चोरीला गेला आहे. या दोन ठिकाणी झालेल्या चोरीची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याची तक्रारदेखील तक्रारदारांनी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कावठे शिवारातील दिनेश घुगे यांच्या मालकीच्या हिरा कमल या बिअर शॉपीमधून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची बिअर आणि वाइनची जवळपास ७० ते ८० खोके चोरट्याने नेली.
दुकानातील इन्व्हर्टरचीदेखील चोरी करण्यात आली आहे. महामार्गालगत असलेल्या या बिअर शॉपीमधून संपूर्ण माल चोरीला गेला आहे. चोरीच्या दोन दिवस अगोदरच जवळ असलेल्या गोकुळ नथ्थू ठाकरे या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे नवे रोटाव्हेटर चोरीला गेले आहे.
यासह पोलिस दप्तरी अनेक लहान-मोठ्या चोऱ्यांची नोंदच होत नसल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. बिअर शॉपीमध्ये चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी दिनेश घुगे गेले असता या घटनेत साक्षीदार नाहीत, एवढ्या मालाची तक्रार देऊ नका, असा सल्ला पोलिसांनी दिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रभारींमुळे चोरट्यांचे फावले
साक्री पोलिस ठाण्यात अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांचे नियुक्ती होत असल्याने चोरट्यांचेदेखील फावले आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारीही केल्या आहेत; परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे उद्विग्न भावना नागरिकांमध्ये आता निर्माण होऊ लागली आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास येणाऱ्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर जनआंदोलन उभे राहण्याचीदेखील शक्यता नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
निवृत्त मुख्याध्यापकाची हेटाळणी
शहरातील कर्मवीरनगरमध्ये राहणारे निवृत्त मुख्याध्यापक सयाजीराव अहिरराव यांच्या मुलीच्या महाविद्यालय सोडल्याचा दाखला हरविल्याबाबत त्यांनी २ एप्रिलला तक्रार दिली होती, मात्र संबंधित तक्रार अर्ज गहाळ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा त्यांनी नवीन तक्रार दाखल केला.
सयाजीराव अहिरराव यांनी पत्रकारांकडे संबंधित विषयाबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना तब्बल दहा दिवसांनंतर संबंधित बालिकेसाठी आवश्यक असलेला दाखला पोलिस ठाण्यातून देण्यात आला. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.