धुळे : माझ्या मागणीवर कार्यवाही होणार असेल, तर येथे भुंकतो (बोलतो) आणि काहीही कार्यवाही होणार नसेल तर खाली बसतो, अशा कठोर शब्दांत हद्दवाढ क्षेत्रातील सत्ताधारी भाजप नगरसेवकाने आपली उद्विग्नता स्थायी समिती सभेत व्यक्त केली. शहरात इतर ठिकाणी कुठे रस्ता डांबरीकरण, कुठे पेव्हर ब्लॉक बसवून देण्याची तत्परता दाखविली जात असताना, हद्दवाढ क्षेत्रात रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी किमान खडी-मुरुम तरी टाका, अशी त्यांची मागणी होती. कार्डियाक रुग्णवाहिका खरेदीसाठी जीईएम पोर्टलवर आलेल्या निविदांबाबत प्रशासनाकडून काहीही खातरजमा न झाल्याचा मुद्दाही सदस्यांनी मांडल्याने याबाबत फेरनिविदा काढण्याचा आदेश सभापतींनी दिला.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. २) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सदस्या प्रतिभा चौधरी यांनी प्रभागातील नऊ मीटरचा रस्ता असताना, पाच मीटरचेच डांबरीकरण झाल्याचे म्हणत उर्वरित कामाची मागणी केली. त्यावर सभापती श्री. नवले यांनी तेथे पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शब्द दिला. हाच धाका पकडत हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग सहाचे नगरसेवक किरण अहिरराव यांनी हद्दवाढ क्षेत्रातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्ते नसल्याचा मुद्दा उपस्थित करत संतापात आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या १५ पैकी दहा सभांमध्ये याप्रश्नी भुंकलोय. मात्र, कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता कार्यवाही होणार असेल तर येथे भुंकतो, अन्यथा बसतो, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. आम्हाला पेव्हर ब्लॉक, डांबरीकरण नको, पण किमान चिखलात खडी-मुरूम कधी टाकणार ते सांगा, असा सवाल त्यांनी सभापती नवले यांना केला. श्री. अहिरराव यांच्या प्रश्नावर सभापती नवले यांनी असंसदीय शब्द वापरू नका, असे म्हणत हद्दवाढ क्षेत्रातील कामांसाठी आठ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन देत श्री. अहिरराव यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
कुणाकडूनही रुग्णवाहिका घेणार का?
जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत कार्डियाक रुग्णवाहिका खरेदीसाठी जीईएम पोर्टलवर प्राप्त निविदा दरांच्या विषयावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सदस्या श्रीमती चौधरी यांनी निविदाधारक ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित आहेत का, असा सवाल केला. सदस्य हर्ष रेलन यांनीही रुग्णवाहिका खरेदीसाठी औषधी दुकानदार, भाजीपाला विक्रेते, अशा कुणीही निविदा भरली, तर त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करणार का, असा सवाल केला. स्थानिक ठिकाणी डीलर, गॅरेज उपलब्ध आहे का हे पाहणार नाही का, असा त्यांचा सवाल होता. सभापती नवले यांनीही प्रथमदर्शनी औषध विक्रेत्यांनी निविदा भरल्याचे दिसत असल्याने योग्य अटी-शर्तींसह फेरनिविदा काढा, असा आदेश दिला.
LED पुन्हा लागणार
सदस्या नाजीयाबानो पठाण यांनी अनेक एलईडी पथदीप बंद पडले आहेत, त्यांची दुरुस्ती कोण करणार, देखाव्यासाठी पथदीप लावले का, असा प्रश्न केला. त्यावर सभापती नवले यांनी पथदीप बसविण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे, दुरुस्तीचे कामही संबंधित ठेकेदाराकडे असल्याचे सांगितले. एलईडी पथदीपांबाबत पुरवणी डीपीआर तयार होणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.