धुळे : शहराच्या दहाव्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी अखेर बुधवारी (ता. ८) विराजमान झाल्या. तसेच महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी किरण कुलेवार, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सारिका अग्रवाल व उपसभापतिपदी विमलबाई पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, निवडीनंतर नूतन चारही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार घेतला. (BJP corporator Pratibha Chaudhary is tenth mayor dhule news)
चालू पंचवार्षिकमधील उर्वरित कालावधीसाठी रिक्त झालेल्या महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. महापौरपदासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपतर्फे अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे रस्सीखेच सुरू होती. यात कोण बाजी मारणार याकडे धुळेकरांचे लक्ष होते.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४ फेब्रुवारीला अखेर भाजपतर्फे प्रभाग ४ (ब)च्या नगरसेविका श्रीमती चौधरी यांचा अर्ज दाखल झाला आणि महापौरपद कुणाच्या वाट्याला या विषयावर पडदा पडला.
त्याचबरोबर स्थायी समिती सभापतिपदासाठी प्रभाग ७ (क)च्या नगरसेविका श्रीमती कुलेवार व महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी प्रभाग १८ (क)च्या नगरसेविका श्रीमती अग्रवाल, तर उपसभापतिपदासाठी प्रभाग १ (ड)च्या नगरसेविका श्रीमती पाटील यांचेच अर्ज दाखल झाले.
शिवाय या निवडणुकीच्या रिंगणात विरोधी पक्षांकडून कुणीही उतरले नाही. त्यामुळे चारही पदे बिनविरोध झाल्याचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशीच निश्चित झाले. दरम्यान, या निवडीची औपचारिक प्रक्रिया तेवढी बाकी होती.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
विशेष सभेत घोषणा
महापौर निवडीसाठी बुधवारी (ता. ८) सकाळी अकराला विशेष सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. महापौरपदासाठी पीठासीन अधिकारी शर्मा यांनी नामनिर्देशनपत्रांची छाननी, वैध नामनिर्देशनपत्राची घोषणा, माघारीसाठी मुदत आदी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पदासाठी एकमेव अर्ज असल्याने श्रीमती चौधरी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
श्रीमती चौधरी यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी महापालिकेबाहेर फटाके फोडत जल्लोष केला. दरम्यान, दुपारी तीनला स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडप्रक्रिया झाली. या पदासाठीही श्रीमती कुलेवार यांचा एकमेव अर्ज होता.
त्यामुळे प्रक्रियेअंती पीठासीन अधिकारी शर्मा यांनी त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर दुपारी चारला महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी निवडीची प्रक्रिया झाली. सभापतिपदासाठी श्रीमती अग्रवाल व उपसभापतिपदासाठी श्रीमती पाटील यांचेच अर्ज होते, त्यामुळे पीठासीन अधिकारी शर्मा यांनी प्रक्रियेअंती त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
नेत्यांच्या उपस्थितीत पदग्रहण
महापौर, सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेनंतर लगेचच सायंकाळी पदग्रहण सोहळा झाला. त्यामुळे महापालिका व परिसर गजबजून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. नूतन महापौर, सभापती, उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांची एकच गर्दी झाली. पदग्रहण कार्यक्रमासाठी आमदार जयकुमार रावल, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पदग्रहणानंतर मिरवणूकही काढण्यात आली.
महापौरांचा कार्यकाळ असा
दिलीप बंड (प्रशासक)...३० जून २००३ ते ३० डिसेंबर २००३
भगवान करनकाळ..........३० डिसेंबर २००३ ते ३ नोव्हेंबर २००६
के. डी. मिस्तरी.............४ डिसेंबर २००६ ते ३१ डिसेंबर २००८
मोहन नवले..................३१ डिसेंबर २००८ ते ३० जून २०११
मंजुळा गावित...............१ जुलै २०११ ते ३० डिसेंबर २०१३
जयश्री अहिरराव............३१ डिसेंबर २०१३ ते ३० जून २०१६
कल्पना महाले..............१ जुलै २०१६ ते १ जानेवारी २०१९
चंद्रकांत सोनार..............१ जानेवारी २०१९ ते ३० जून २०२१
प्रदीप कर्पे.....................१७ सप्टेंबर २०२१ ते १६ मे २०२२
प्रदीप कर्पे....................११ जुलै २०२२ ते ७ जाने २०२३
प्रतिभा चौधरी...................... ८ फेब्रुवारी २०२३ ते पुढे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.