Election Results : जळगावात महाजनांचा जोर; मोदी फॅक्टरमुळे भाजप सुसाट

unmeshpatil.jpg
unmeshpatil.jpg
Updated on

जळगाव : भाजपच्या जिल्ह्यातील दोन नेत्यात अंतर्गत लोकसभेच्या उमेदवारीवरून सुंदोपसुंदी, पदाधिकाऱ्यांत थेट व्यासपीठावर झालेली हाणामारी यामुळे जिल्ह्यात भाजप कमकुवत झाल्याचे चित्र दिसत होते. त्यातच शिवसेनेची काहीअंशी नाराजीही होती. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुलाबराव देवकर यांचे नाव जाहीर केले होते. कॉंग्रेसनेही त्यांच्या उमेदवारीवर आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना जळगाव मतदार संघात यश मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव,जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवाराच्या विजयासाठी लावलेला जोर आणि भाजपचे बूथ ते मतदान पन्नाप्रमुखापर्यंतचे जाळे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या संघटनाचा अभाव यामुळे भाजपतील वादही झाकोळले गेले आणि त्याचा फायदा उन्मेश पाटील यांना झाला. 

जळगाव लोकसभा मतदार संघ हा गेल्या वीस वर्षापासून भाजपचा बालेकिल्लाच म्हटला जात आहे. ए.टी.पाटील तर या मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. मात्र सोशल मिडीयावर त्यांचे वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली, भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यांनी अर्ज भरलेला असतानाही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपत अंतर्गत वाद अधिकच वाढले.

अगोदरच जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे याच्या उघड वाद, त्यातच खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या गटात नाराजी. तर अमळनेर येथे माजी आमदार बी.एस. पाटील यांना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यासपीठावर केलेली मारहाण यामुळे भाजपत सार काही आलबेल नाही हे दिसून आले होते. त्याचा फटका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला बसणार असे चित्र होते. 

महाजनांची जबाबदारी अन्‌ भाजपचे संघटन 
भाजपमधील विसंवादाचे चित्र असतानाही राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आमदार उन्मेश पाटील यांच्या विजयाची जबाबदारी घेतली. त्यासाठी त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघात ठिय्या मांडला. त्यांनी प्रचारात मतदार संघातील प्रत्येक तालुका पिंजून काढला. या शिवाय भाजपच्या निवडणुकीसाठी बुध प्रमुख ते पन्ना प्रमुख असे असलेली मजबूत संघटन त्यांनी उपयोगात आणली.  विशेष म्हणजे ग्रामीण भागात त्यांना त्याचा फायदा झाला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॅक्‍टरचा मतदारांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव होताच. त्यामुळे भाजपतील अंतर्गत झालेल्या वादाचाही जनतेवर परिणाम झाला नसल्याचे जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे उन्मेश पाटील यांना दोन लाखापेक्षा मतांचे मिळालेले मताधिक्‍यावरून दिसून येत आहे. त्यांना जळगाव तालुक्‍यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात मोठे मताधिक्‍य मिळाले आहे. 

कॉंग्रेस- राष्ट्रवादीत संघटनेचा अभाव 
जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांची उमेदवारी भक्कम मानली जात होते. माजी पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य, त्यांचा शांत व सर्वांना सोबत घेण्याचा स्वभाव यामुळे त्यांची उमेदवारी घोषित होताच त्यांना यश मिळणार हे निश्‍चित मानले जात होते. विशेष म्हणजे मित्र पक्ष कॉंग्रेसनेही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले होते. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते शरद पवार यांनीही प्रचार सभा घेतली होती. जिल्ह्यात भाजपतील अंतर्गत वाद, उमेदवारीवरून झालेले वाद यामुळे देवकर यांना यश मिळेल असे मानले जात होते. सर्व वातावरण "आघाडी'च्या यशासाठी अनुकूल असताना ते त्याचा फायदा घेऊ शकलेले नाहीत.

त्यांचा झालेला मोठा मताधिक्‍याचा पराभव यामुळे त्यांनी जोरदार टक्कर दिली असे म्हणता येणार नाही. मतदार संघातील त्यांना कोणत्याही तालुक्‍यात सुरवातीपासून एकदाही आघाडी मिळालेली नाही, अगदी त्यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातही प्रत्येक गावात त्यांची पिछाडी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे संघटनेचा अभाव दिसून आला. अगदी ग्रामीण व शहरी भागातही कार्यकर्त्यांचा थेट मतदारांपर्यंत पोहोचणारे कार्यकर्त्याच जाळ दिसून आले नाही. त्यात भाजप एक नव्हे तर दहा पाऊल पुढेच होते. त्यामुळेच "आघाडी'ला हार पत्करावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.