Dhule News :आयुष्मान भव मोहिमेंतर्गत दिलेल्या सहा निर्देशांकाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पातळीवर ‘आयुष्मान ग्रामपंचायत’ घोषित करून पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्यामुळे या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी बोरकुंड (ता. धुळे) येथे केले.(CEO Shubham Gupta appeal Strive for Ayushman Gram Panchayat dhule news)
आयुष्मान भव मोहिमेंतर्गत बोरकुंड येथे सावता मंगल कार्यालयात सोमवारी (ता. २) आयुष्मान ग्रामसभा झाली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, सीईओ गुप्ता, जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे, अनिता पाटील, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी, सरपंच सुनीता भदाणे, उपसरपंच बेबाबाई माळी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके आदी उपस्थित होते.
सीईओ श्री. गुप्ता म्हणाले, की आयुष्मान भव मोहिमेंतर्गत मार्च-२०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सर्व पाच वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करणे, पाच वर्षांवरील सर्व नागरिकांना आभाकार्डचे वाटप, ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, संशयित कर्करोग निदान व उपचार, ३० वर्षांपर्यंत नागरिकांची सिकलसेल तपासणी, संशयित कुष्ठरोग तपासणी व यशस्वी उपचार करून ग्रामपंचायतस्तरावर वरील सहा निर्देशकांचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रा. जाधव म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे जाणले म्हणूनच तळागाळातल्या माणसाला आरोग्याचे कवच मिळावे या हेतूने आयुष्मान भव अभियान संपूर्ण देशात राबविली जात आहे. बोरकुंड ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य केल्यास नक्कीच हा पुरस्कार प्राप्त होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
१,२९६ आजारांवर उपचार
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी प्रास्ताविकातून आयुष्यमान कार्डमार्फत नागरिकांना एक हजार २९६ आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. बोरकुंड गावात ६६० आयुष्मान कार्डचे लाभार्थी असून, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. तरन्नुम पटेल यांनी उपस्थितांना अवयवदानाची शपथ दिली.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते टीबी चँपियन, निक्षय मित्र यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आभाकार्डचे वितरण करण्यात आले. ग्रामसभेनिमित्त झालेल्या शिबिरास सीईओ गुप्ता यांनी भेट देत ग्रामस्थांची विचारपूसही केली. रावसाहेब भदाणे, भीमराव देवरे, रवींद्र भदाणे, संजय माळी, मोहन भदाणे, मनोज अहिरे, दिनेश पाटील, संजय भदाणे, प्रशांत आढावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रशेखर भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज अहिरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.