Nandurbar News | नोव्हेंबर २००५ पूर्वी नोकरीस लागलेल्या शिक्षकांना त्या काळी शासनाने संबंधित शाळांना अनुदान दिले नाही म्हणून पेन्शन लागू झाली नाही. शिक्षकांवर झालेला अन्याय चुकीचा आहे.
त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
अभ्यासाअंती शिक्षकांना जुनी पेन्शन देणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शहादा येथे सांगितले. (Chief Minister assurance Teacher MLA Dnyaneshwar Mhatre information Old pension will be given to teachers after graduation Nandurbar News)
शहादा येथील तालुका एज्युकेशन संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ व एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त जुनी पेन्शन कृती समिती यांच्यातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक झाली होती. त्या वेळी आमदार म्हात्रे बोलत होते.
या वेळी तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, जयदेव पाटील, जे. के. पाटील, गणेश पाटील, जी. एन. पाटील, लक्ष्मीकांत पाटील, एल. एच. चौधरी, जगदीश पाटील, किरण पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील, किरण सोनवणे, राकेश जोशी, एस. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार म्हात्रे म्हणाले, की १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न त्याचबरोबर अनुदान, वाढीव पदे, अतिरिक्त शिक्षक यांसह विविध प्रश्नांची मांडणी सातत्याने सभागृहात करीत आहे.
इतर राज्यांत लागू केलेली जुनी पेन्शन योजना अद्यापही कागदावरच आहे. केंद्राने परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, संचमान्यता या प्रश्नासंबंधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू आहे.
त्याचबरोबर निवडश्रेणी ही फक्त २० टक्के लोकांना मिळते, तसेच आश्वासित प्रगत योजना लागू करण्यासंबंधी प्रश्नही रेटून धरला आहे.
१९०१ च्या प्रश्नासंबंधी ही पाठपुरावा सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात ज्या जमिनीवर शाळा सुरू आहे ती नावावर नाही, तिला अनधिकृत न करता नाममात्र फी घेऊन तिला कायम करण्याची मागणीही केली आहे.
पेन्शन मिळणारच
शिक्षकांना पेन्शन मिळावे यासाठी आझाद मैदानावर उपोषण झाले. अनेक संघटना एकत्रित झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून जुन्या पेन्शन योजनेसंबंधी बारकावे लक्षात आणून दिले. त्या वेळी त्यांनी सगळ्या बाबी समजून लवकरात संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पदरात पडेल, असे आश्वासन दिल्याचे आमदार मात्रे यांनी सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. अनेक समस्यांना तोंड देत येथील शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत असतात.
न्याय्य हक्कासाठी अनेक वेळा आंदोलन करावे लागते. ग्रामीण भागात राहण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने आजही अनेक महिला शिक्षिका खडतर प्रवास करून नोकरी करतात. त्यामुळे मुख्यालयात राहण्याच्या प्रश्न मार्गी लावावा. जिल्ह्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, ते सभागृहात मांडून मार्गी लावण्याचे आवाहन अभिजित पाटील यांनी आमदार म्हात्रे यांना केले. राकेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.