नाशिक - सायबर गुन्हेगारांच्या रडारवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर या मेट्रोसिटी आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने अन् त्याचा निष्काळजीपणे वापर करणाऱ्यांवर पाळत ठेवणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले. बॅंकांसह कंपन्यांचा डेटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डेटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्यांस लगाम घालण्यासाठी "सर्ट महाराष्ट्र' (कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) विभागाची निर्मिती करण्यात आली असून, या माध्यमातून लवकरच डेटा चोरीला आळा घातला जाणे शक्य होणार आहे.
सायबर गुन्हेगारीमध्ये 98 टक्के गुन्हेगार हे भारतीय असून, ते बॅंकांच्या नावाने, नोकरी वा लग्नाचे आमिष वा दामदुपटीचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करतात. तर, 2 टक्के गुन्ह्यांत परदेशी गुन्हेगार आहेत. यात कंपन्यांचा डेटा हॅक करणे वा बिटक्वाइनच्या माध्यमातून फसवणूक करणे. विशेषतः यात नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे जाळे असल्याचे तपासातून समोर आले आहे.
"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती
"सर्ट महाराष्ट्र' विभागाने पायरसीशी संबंधित 10 संकेतस्थळे बंद केली. तर, डाटाबेसलिंकमध्ये शिरकाव करून येत्या काळात "सर्ट महाराष्ट्र'च्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीवर आळा घालणे शक्य होणार आहे.
नाशिक सायबर विभाग सर्वोत्तम
सायबर गुन्हेगारीत राज्यात मुंबई आघाडीवर, तर त्याखालोखाल पुणे शहर- ग्रामीण, नागपूर शहर- ग्रामीणचा समावेश आहे. तर, राज्यातील सर्वोत्तम सायबर लॅब ही नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या सायबर पोलिस ठाण्याची आहे. नाशिक सायबर पोलिसात एकही गुन्हा प्रलंबित नाही, हेच सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाण आहे.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वोत्तम पर्याय आहे. मोबाईल वापरकर्त्यांनी काळजी घेतली तर फसवणूक होऊच शकत नाही. त्यासाठी राज्यभर पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.
- बालसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, राज्य सायबर सिक्युरिटी विभाग, मुंबई
दृष्टिक्षेपात...
भारताची लोकसंख्या : 1 कोटी 25 लाख
मोबाईल वापरकर्ते : लोकसंख्येच्या 70 टक्के
राज्यात ऑनलाइन फसवणूक : 2400 कोटी रुपये (2016-17)
सायबर इकॉनॉमिक्स गुन्हे : 60 टक्के
महिला/मुलांचे शोषण : 30 टक्के
भारतीय सायबर गुन्हेगार - 98 टक्के
परदेशी सायबर गुन्हेगार - 2 टक्के
|