Kanhayalal Maharaj Yatrotsav : श्री कन्हयालाल महाराजांच्या कार्तिकी यात्रोत्सवाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी (ता. २४) यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विक्रमी तब्बल तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
आमळी यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि श्री कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी गेल्या आठवडाभरात तब्बल दहा लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. (Darshan by 3 lakh devotees on Friday at Kanhaiyalal Maharaj Yatrotsav dhule news)
मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन किलोमीटर परिसरात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. गेल्या आठवडाभरापासून आजपर्यंत दहा ते अकरा कोटींची उलाढाल झाली असून, दहा लाख भाविकांनी यात्रोत्सवात सहभाग घेत दर्शन घेतले.
दरम्यान, रात्री नऊला श्री कन्हयालाल महाराजांची आदिवासी विकासमंत्री डॉ. विजकुमार गावित यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. ट्रस्टी किरण दहिते, कन्हय्यालाल दहिते, वसंत घरटे, भाविक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
दुष्काळातही भाविकांची उपस्थिती
कार्तिकी एकादशीच्या वार्षिक यात्रेच्या आनंद सोहळ्यात अनेक कुटुंबे आज सहभागी होऊन कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनाने समाधान मिळविण्यासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक दाखल झाले होते. अनेक भाविक कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. रात्रभर ठिकठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचने सुरू होती.
गेल्या पाच दिवसांपासून भाविकांचा महामेळा अहोरात्र सुरूच होता. भाविकांनी यात्रेत खरेदी करून उत्साह द्विगुणित केला. आज सकाळपासूनच सर्वत्र खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आमळीकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर दिवसरात्र वाहनांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तरीही वाहतूक सुरळीत होत नव्हती. जिल्ह्यात व राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबांना बसला. त्यांचे आर्थिक गणित बिघडले, असे असतानाही मात्र त्याचा यात्रोत्सवावर गर्दी व आर्थिक उलाढालीवर कुठलाही परिणाम दिसून आला नाही.
खरेदीसाठी झुंबड
रात्रभर दुकाने, मनोरंजनाची साधने, तमाशा, आदिवासी सोंगाड्या पार्टी, मौत का कुवा, उंच पाळणे आदी सुरूच होती. रात्रीही गर्दी कायम होती. व्यावसायिकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे यात्रोत्सवाचा परिसर मोठा असूनही जागा कमी पडली. त्यामुळे गावातील बहुतांश गल्ल्यांमध्ये दुकाने थाटली गेली.
भांडी, कापड, शेती, अवजारे, किराणा, हॉटेल्स, नारळ, केळी, खजूर, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. उपविभागिय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, वीज कंपनीचे अधिकारी सोनल नागरे व कर्मचारी, एसटीचे अधिकारी व कर्मचारी आमळीत तळ ठोकून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.