Nandurbar News : तोरणमाळ (ता. धडगाव) येथे शासकीय आश्रमशाळेतील पहिलीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शाळा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला.
दरम्यान, शाळेत अन्य विद्यार्थीही गंभीर आजारी असल्याचे आढळून आले. त्यामुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ (ता. धडगाव) येथे आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा सुरू आहे. (Death of student in an ashram school in Toranmal nandurbar news)
तोरणमाळ येथे सिंदीदिगर व झापी या दोन्ही शासकीय आश्रमशाळांत प्रवेशित विद्यार्थ्यांनाही याठिकाणी वर्ग करण्यात आले. तेथे तिन्ही शाळांचे एकूण ६५० विद्यार्थी आहेत.
त्यापैकीच इयत्ता पहिलीचा विद्यार्थी डेबा दिला तडवी (वय ७) हा तीन दिवसांपासून आजारी होता. त्याला सोमवारी (ता. ७) तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला औषध देण्यात आले. तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्याला पुन्हा त्रास होऊ लागला.
डेबा दुपारी झोपलेला असताना काही विद्यार्थी त्यास उठविण्यासाठी गेले असता तो उठला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी डेबा यास रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निष्काळजीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू
विद्यार्थी डेबा तडवी हा आजारी असूनही त्याच्याकडे अधीक्षक अथवा कुठल्याही जबाबदार कर्मचाऱ्याने लक्ष दिले नसल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना आम्ही कळविले, असेही त्या विद्यार्थ्याने सांगितले.
त्यामुळे हा निष्काळजीपणाचा बळी असल्याचे विद्यार्थ्याचे वडील दिला किर्ता तडवी यांनी म्हटले आहे. दरम्यान, तीन महिन्यांत १४९ विद्यार्थ्यांना किरकोळ आजाराची लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अन्य विद्यार्थीही आजारी
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तेथे पोहोचलेल्या पालकांना अन्य विद्यार्थीही आजारी असल्याचे आढळून आले. त्यात चेतन धुडक्या वसावे (दुसरी), गोविंद जिवा वसावे (दुसरी), कोमल्या जोरसिंग नाईक (तिसरी) या विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. प्रताप गुलाबसिंग वसावे याला डोकेदुखीचा त्रास होता. मिथुन ओल्या वळवी या विद्यार्थ्याचा चेहरा, हाताची नखे अगदी पिवळी पडली असून, तो गंभीर आजारी असल्याचे सांगण्यात आले.
"डेबाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. त्याची प्रकृती एवढी गंभीर नव्हती, त्यामुळे त्यास स्थानिक स्तरावर उपचार केले. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून आश्रमशाळेत स्वतंत्र डॉक्टर, रुग्णवाहिका व परिचर असणे आवश्यक आहे." - पी. जी. पाटील, मुख्याध्यापक, आश्रमशाळा, तोरणमाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.