Dengue Precautions : डेंगीला कारणीभूत एडिस डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात, वर्षानंतरही त्यांना पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते.
त्यामुळे डासांची अंडी नष्ट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, डेंगी नियंत्रण व प्रतिबंधासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले. (Dengue from mosquitoes Take this precaution dhule news)
डेंगी आजाराने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास शासनास सातत्याने यश आले आहे. डेंगी हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे या रोगाची लागण होते.
डेंगी संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर डास सांसर्गिक होतो. त्यानंतर तोच सांसर्गिक डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंगीचा संसर्ग होतो. डास चावल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसांनंतर डेंगी आजाराची लक्षणे दिसायला लागतात.
डेंगी हा फ्लूसारखाच ताप आहे. तो डेंगी-१, डेंगी-२, डेंगी-३, डेंगी-४ या विषाणूपासून होतो. एडिस डासांची लांबी पाच-सहा मिलिमीटर असते. या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला ‘टायगर मॉस्क्युटो’ असेही म्हणतात.
हा डास दिवसा चावतो. तो लोंबकळणाऱ्या वस्तू (उदा. दोरी, वायर, छत्री, काळे कपडे आदी) यांच्यावर विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते.
त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासूनपुसून धुऊन स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून त्याची पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील, असे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उत्पत्ती रोखण्याचे उपाय
परिसर स्वच्छता-घराभोवती/परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नयेत. त्या नष्ट कराव्यात. खराब टायर पंक्चर करावेत. पंक्चर दुकानातील टायर्समध्ये पाणी साठणार नाही, अशा पद्धतीने रचावेत.
पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. शौचालयाच्या व्हेंट पाइपाला जाळी अथवा कापड बांधावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावेत.
कूलरमधील पाणी, फ्रीजच्या डिस्फ्रॉस्टिंग ट्रेमधील पाणी, फुलदाण्यांमधील पाणी आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे.
उपाययोजना करा, उपचार घ्या
डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी झोपताना विशेषतः कीटकनाशकभारित मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक मलम/अगरबत्ती वापरावी. घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत.
डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे हौदात, विहिरीत व डबक्यात सोडावेत. डेंगी तापाची लागण झाल्यास रक्तजल नमुन्याची तपासणी करून घ्यावी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
विशिष्ट औषधोपचार नाही
विशेष महत्त्वाचे म्हणजे डेंगीच्या विषाणूविरोधात विशिष्ट प्रकारचा औषधोपचार उपलब्ध नसल्याने त्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नाही.
मात्र, डेंगी प्रसारक एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे आपल्याला शक्य असल्याने, एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक सहभाग आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी पाटील यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.