Dhule News: अक्कलपाडा पाणीयोजनेद्वारे धुळेकरांना रोज मुबलक, शुद्ध पाणीपुरवठ्याचे गाजर आता पार संपायला आले पण धुळेकरांची अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. या योजनेच्या कार्यान्वयनातही विघ्नांची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे.
अक्कलपाडा पाणीयोजनेवरून देवपूर भागात पाणीपुरवठा सुरू झाला खरा पण गेल्या काही दिवसांतच योजनेवरील पाइपलाइन दोनदा फुटली. (Devpur area has no water from 8 days dhule news )
त्यामुळे देवपूरमधील अनेक भागांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. ज्या भागाला पाणी मिळाले, त्यांनाही गढूळ आणि अशुद्ध पाणी मिळाल्याची तक्रार आहे.धुळे शहरवासीयांची आठ-आठ, दहा-दहा दिवसांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी महत्त्वाकांक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे स्वप्न दाखविले गेले.
१६९ कोटींची ही योजना मंजूरही झाली. कशीबशी योजना आता पूर्णत्वास आल्याचे सांगितले जाते.मात्र अद्यापही या योजनेच्या अधिकृत उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही. मागील अनेक महिन्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून आज पाणी येईल, उद्या पाणी पोचेल अशी स्वप्ने दाखविली जात आहेत.
प्रत्यक्षात अनेक तांत्रिक अडचणी असल्याने आजपर्यंत योजनेचे उद्घाटन झालेले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून योजनेची चाचणी सुरू आहे. मात्र, विविध समस्या निर्माण होत आहेत. अशा या चाचणी प्रयोगांतर्गतच धुळे शहरातील देवपूर भागात अक्कलपाडा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
विशेषतः रामनगर जलकुंभातून हा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, त्यातही आता विघ्नांची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मोराणेजवळ योजनेची पाइपलाइन फुटली. त्यामुळे देवपूर भागातील प्रमोदनगर, इंदिरा गार्डन परिसरासह इतर भागात गढूळ, अशुद्ध पाणीपुरवठा झाला. त्यामुळे पाणी येऊनही त्याचा नागरिकांना फायदा झाला नाही.
पुन्हा पाइपलाइन फुटली
पाइपलाइन दुरुस्त केल्यानंतर पाणीपुरवठा सुरू होत नाही तोच सोमवारी (ता. २) पुन्हा अक्कलपाडा योजनेवरील पाइपलाइन फुटली आहे. यामुळे देवपूर भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. वाडीभोकर रोड, विजय पोलिस कॉलनी, रामनगर परिसर, राजीव गांधी शाळा परिसर, एसआरपी कॉलनी आदी विविध भागांतील नागरिकांना आठ-दहा दिवसांपासून पाणी मिळालेले नाही.
त्यामुळे या भागातील नागरिक प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रारी करत आहेत. अक्कलपाडा योजनेवरील दुसरा पंपही सुरू केल्याने प्रेशरमुळे पाइपलाइन फुटल्याचे सांगितले जाते. मात्र नवीन योजना, नवीन पाइपलाइन, एमजेपी व महापालिकेचे तज्ज्ञ अभियंते, तंत्रज्ञ असताना या समस्या कशा येत आहेत हे कळायला मार्ग नाही.
नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
आठ-आठ, दहा-दहा दिवस पाणी मिळत नसल्याने, गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठ्याने देवपूर भागातील आता वैतागले आहेत.
या नागरिकांना आता अक्कलपाडा योजनेचे नाव सांगितले तरी ते योजनेचे नाव ऐकून आता थकलो, असे म्हणतात व जुन्याच योजनेवरून पाणी द्या, असे सांगतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी दिली. नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
त्यामुळे येत्या १५ दिवसांत समस्या दूर झाली नाही तर नागरिकांना घेऊन आंदोलन करू, असा इशाराही श्री. देवरे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.