Dhule Municipality News : कोविड-१९ संसर्गाने मृत्यू झालेल्या धुळे महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत प्राप्त झाली. या मदतीचे धनादेश गुरुवारी (ता. २२) महापालिकेत संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आले. महापालिकेतील वर्ग-४ चे हे कर्मचारी होते. कर्तव्य बजावताना त्यांना कोविडची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.
संपूर्ण जगात कोविड-१९ ची साथ आल्यानंतर प्रत्येक शहरात लॉकडाउन होते. त्यामुळे कोविड संसर्ग टाळण्यासाठी कुणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. (1 crore to heirs of deceased 2 municipal employees)
या काळात मात्र शासकीय अधिकारी-कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य, पाणीपुरवठा अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र मात्र आपले कर्तव्य बजावत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता ते काम करत होते.
धुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील हद्दवाढ भागातील वर्ग-४ चे कर्मचारी अशोक रामसिंग वाघ व सुदाम माला चौधरी आपल्याकडील पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना कोविड-१९ चा संसर्ग झाला. यातच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
शासनाकडून मदत
महाराष्ट्र शासनाकडील संचालक, नगर परिषद संचालनालय मंत्रालय मुंबई यांच्याकडून कोविड-१९ मध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आले. यात धुळे महापालिकेतील मृत कर्मचारी अशोक वाघ व सुदाम चौधरी यांच्या वारसांनाही हे आर्थिक सहाय्य मंजूर झाले.
प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश गुरुवारी महापालिका सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्या हस्ते मृत कर्मचारी अशोक वाघ यांच्या पत्नी शीला वाघ व मृत कर्मचारी सुदाम चौधरी यांच्या पत्नी सुनंदाबाई चौधरी यांना देण्यात आले.
मदतीची ही रक्कम आरटीजीएसने त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त हेमंत निकम, मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील, अभियंता कैलास शिंदे आदी उपस्थित होते.
दरम्यान, शासनाकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीसाठी महापालिका प्रशासनाबरोबरच माजी महापौर कर्पे यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला. श्री. कर्पे यांनी याप्रसंगी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांप्रति सहवेदना व्यक्त करत मिळालेल्या मदतीचा कुटुंबाच्या भवितव्यासाठी उपयोग करा, असे आवाहन केले. या वेळी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी शासनाकडून मिळालेल्या या मदतीबद्दल व महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल साश्रुनयनांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.