Dhule ZP Teacher Recruitment : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ११४ पदे रिक्त आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी आचारसंहितेमुळे ७ जुलैपर्यंत ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊनदेखील तीन आठवड्यांपर्यंत उपलब्ध शिक्षकांवरच वर्ग निभावून नेण्याची वेळ येणार आहे. (114 posts of teachers are vacant in Zilla Parishad schools )
१२० पदे रिक्त
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६९ शाळा आहेत. त्यात प्राथमिक शिक्षकांची ८९१ पदे असून, ७७७ पदे भरलेली, तर ११४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही शाळा एकशिक्षकी, तर काही दोनशिक्षकी करून तूर्तास उपाययोजना करण्यात आली आहे. पदोन्नती मुख्याध्यापकांची ४६ पदे मंजूर असून, ४३ पदे भरली आहेत, तर तीन पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची १८ पदे मंजूर असून, १६ पदे भरली आहेत, तर दोन पदे रिक्त आहेत. विस्ताराधिकाऱ्यांची आठपैकी सहा पदे भरली असून, एक पद रिक्त आहे.
पाठ्यपुस्तकांचे आज वितरण
पंचायत समितीच्या शिक्षक विभागातर्फे शाळेच्या पहिल्या दिवशीच शनिवारी (ता. १५) विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे पाठविण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांची विगतवारी करून, गठ्ठे तयार करून बहुतांश शाळांना पोचविण्यात आले आहेत. गावातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात येणार आहे.
दोन लाख पुस्तकांचे वितरण
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६९, पालिकेच्या १० तर अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळा आणि आश्रमशाळा मिळून ९९ अशा एकूण ३७८ शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. उर्वरित ४४ विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून पाठ्यपुस्तके खरेदी करावी लागतात. (latest marathi news)
या वर्षी मराठी माध्यमासाठी एक लाख ११ हजार ५३०, मराठी सेमी माध्यमासाठी ७२ हजार ८१४, इंग्रजी माध्यमासाठी दोन हजार ७१८, ऊर्दू माध्यमासाठी चार हजार ८९२, तर ऊर्दू सेमी माध्यमासाठी दोन हजार ६४४ पुस्तके प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. नीता सोनवणे यांनी दिली.
प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय बनवून त्यांना शाळेत नियमित येण्याची गोडी लागावी या हेतूने शिक्षण विभागातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक, वाद्यवृंदांच्या तालावर गुलाबपुष्प देऊन स्वागत, आनंददायी खेळांचा परिचय, औक्षण, फुगे व खाऊचे वाटप आदी माध्यमातून शाळाप्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यासाठी वर्गखोल्यांसह शाळांच्या परिसराची विशेष सजावट करण्यात आली आहे.
''प्राप्त पाठ्यपुस्तकांच्या संख्येतून पात्र शाळेसाठी वितरणाचे नियोजन केले आहे. पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि प्रवेशोत्सवाची तयारी यासाठी सुटीच्या कालावधीतही अधिकारी व शिक्षक कार्यरत होते. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर बदल्यांद्वारे शिक्षकसंख्येची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांकडे वळविण्यात आम्हाला समाधानकारक यश लाभले आहे.''-गणेश सुरवाडकर, गटशिक्षणाधिकारी, शिरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.