धुळे : कोरोना (corona) विषाणूंच्या संसर्गाशी गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र मुकाबला करणाऱ्या येथील चक्करबर्डीतील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय (Hire Medical Government College)आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालय आता रक्ताच्या तुटवड्यामुळे (Blood shortage) चिंतेत सापडले आहे. रूग्णालयात नॉन- कोविड रूग्णसंख्या वाढत असल्याने रक्ताची गरज भासू लागली आहे. या रूग्णालयाच्या रक्तपेढीत केवळ दहा बाटल्या शिल्लक असल्याने विविध पक्ष, संस्था, संघटनांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.( dhule blood shortage crisisi blood banks low blood bags)
कोरोनाशी हिरे महाविद्यालयासह संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने यशस्वी लढा दिला. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात जिल्हा सरकारी यंत्रणेला यश आले आहे. सद्यःस्थितीत सरासरी शून्य ते सहा या संख्येत बाधित रूग्ण आढळत आहेत. असे असताना इतर आजारांची रुग्णसंख्या शहरासह जिल्ह्यात वाढू लागली आहे. त्यात डेंग्यू, सांधेदुखी, फ्लू, मलेरिया, टायफॉईड यासारखे आजार बळावत आहेत.
तीनशे रूग्ण दाखल
हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात सद्यःस्थितीत सरासरी ३०० नॉन- कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. शिवाय प्रसूती, अपघातासह विविध शस्त्रक्रिया नियमित सुरू झाल्या आहेत. या स्थितीत थॅलेसिमिया, ॲनिमिया आदी प्रकारचे रुग्णही येत आहेत. अशा विविध प्रकारच्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. मात्र, रूग्णालयाच्या रक्तपेढीत केवळ दहा बाटल्या शिल्लक असल्याने व्यवस्थापन चिंतेत आहे. त्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न होत आहे. यात दिवसाकाठी सरासरी ४० ते ५० रक्ताच्या बाटल्या मिळाल्या तरी थॅलेसिमिया, ॲनिमिया, प्रसूती, विविध शस्त्रक्रियांवेळी रक्ताचा साठा संपतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा रक्ताचा तुटवडा भासून गरजू रुग्णांपुढे अडचणी निर्माण होतात.
संस्था, संघटनांना आवाहन
या पार्श्वभूमीवर हिरे महाविद्यालय आणि रूग्णालय व्यवस्थापनाला जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील संस्थांकडून मदतीचा हात हवा आहे. संबंधितांनी व्यापक प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करून हिरे महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णाच्या रक्तपेढीला बाटल्या दिल्या तर अनेक गरजू रुग्णांचा प्रश्न सुटून अनेकांना जीवदान मिळू शकणार आहे. त्यामुळे संबंधित संस्था, संघटना, विविध पक्षांनी रक्तदानाचे उपक्रम राबवून या रुग्णालयास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
कोरोनाबाधितांना विशेष सूचना
कोरोनाने बाधित रूग्ण तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकतात. तीन महिने झाल्याशिवाय त्यांनी रक्तदान करण्याचे टाळावे, असे आवाहनही हिरे महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.