शिरपूर : थाळनेर (ता.शिरपूर) येथे स्वस्त धान्य दुकानातून भेसळयुक्त तांदूळ ग्राहकांना दिला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोमवारी (ता.२३) सरपंच मेघा निकम व पंचायत समितीचे उपसभापती विजय बागूल यांनी दुकानातील मालाची पाहणी केली. तक्रारीत तथ्य आढळल्याने तहसीलदार महेंद्र माळी यांना माहिती देण्यात आली. पुरवठा विभागातर्फे तांदळाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. थाळनेर गावातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०६ विनोद फुलपगारे चालवतात. (Complaint of consumers of adulterated rice supply to Thalner )
सप्टेंबरसाठी देण्यात आलेल्या स्वस्त धान्याचा पुरवठा ग्राहकांना केला जात आहे. दुकानातून तांदूळ घेतल्यानंतर सकाळी खिचडी करीत असताना त्यात प्लॅस्टिकसदृश्य कण आढळले. त्यामुळे काही महिलांनी सरपंच मेघा निकम यांच्याकडे तक्रार केली. उपसभापती विजय बागूल, मेघा निकम, ग्रामविकास अधिकारी जी. के. वेताळे, प्रेमचंद शिरसाठ, रूपेश निकम, संदीप पाटील, सुनील शिरसाट, जिभाऊ रायसिंग, तक्रारदार मंगला मराठे, मनोज बागूल आदींनी दुकानात भेट देऊन पाहणी केली. तेथील तांदळाची गोणी फोडून पाहणी केल्यावर भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरपंच निकम यांनी तहसीलदारांकडे व्हॉट्सअॅपद्वारे घडल्या प्रकाराची माहिती दिली.
तांदूळ चिटकला नि गोळा झाला
तांदळात प्लॅस्टिकच्या तांदूळसदृश्य दिसणाऱ्या कणांची भेसळ असल्याचा ग्राहकांचा प्रमुख आरोप आहे. तांदळाचे कण पाण्यावर तरंगत होते. ते काढून तापल्या तव्यावर टाकले असता, त्यातून डांबरासदृश्य पदार्थ बाहेर पडून भाजले जाण्याऐवजी एकमेकांना व तव्याच्या पृष्ठभागाला चिटकल्याचे दिसून आले. त्यामुळे भेसळ केलेला तांदूळ म्हणजे प्लॅस्टिकचे दाणेच आहेत, असा दावा तक्रारदारांनी केला.
''तांदळात भेसळ असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे दुकानात भेट दिली. तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळले. ग्राहकांनी तांदळातून काळा पदार्थ तयार झाल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओही पाठविले आहेत. तहसीलदारांकडे तक्रार पाठविली आहे.''- मेघा निकम, सरपंच
''संबंधित प्रकाराची चौकशी करावी, तांदळाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत, असे आदेश पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेसळ आहे किंवा नाही, असल्यास कशाची आहे त्याची स्वतंत्र चौकशी केली जाईल. या प्रकाराचा संपूर्ण पाठपुरावा केला जाणार आहे.''- महेंद्र माळी, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.