Dhule Crime News : भाटपुरा (ता. शिरपूर) येथे युवकाच्या खुनाचा कथित प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांना अश्रूधूर व बळाचा वापर करुन जमाव पांगवणे भाग पडले. युवकाला मारहाण करुन खून केल्याच्या संशयावरुन मृताचा मेव्हणा व अन्य एक अशा दोन संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crowd threw stones at police after murder )
पंढरीनाथ भगवान चौधरी (वय २४, रा. विठ्ठल नगर, भाटपुरा) असे मृताचे नाव आहे. त्याला मद्याचे व्यसन होते. मद्याच्या धुंदीत तो आई- वडिलांना त्रास देत असल्याने त्याची समजूत घालण्यासाठी त्याचा मेव्हणा नितीन भगवान चौधरी व घनश्याम तथा मनोज गुलाब चौधरी (दोघे रा. धरणगाव, जि. जळगाव) भाटपुरा येथे ८ मे रोजी आले होते. दोघांनी त्याला लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पंढरीनाथचा मृत्यू झाला. हे वृत्त कळताच विठ्ठल नगरमध्ये मोठा जमाव जमला.
गावात बंदोबस्त
सायंकाळी थाळनेर पोलिस घटनास्थळी पोहचले. जमावाने त्यांच्याकडे संशयितांना अटक करण्याची मागणी केली. जमावातील काहींनी पोलिसांशी हुज्जत घालून दगडफेक केली. त्यात शासकीय वाहनाच्या काचा फुटल्या. काही पोलिसांनाही दगडांचा मार लागला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बलप्रयोग करुन जमाव पांगवला. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला.
दोघांवर गुन्हा
दरम्यान, मृत पंढरीनाथचे वडील भगवान यशवंत चौधरी (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित नितीन चौधरी व मनोज चौधरी यांच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात तपास करीत आहेत.
मृतावर अंत्यसंस्कार
८ मे रोजी सायंकाळी उशिरा पंढरीनाथचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही. गुरुवारी (ता. ९) सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी भाटपुरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात शांतता असून बंदोबस्त कायम ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांवर हल्ले वाढले
पोलिसांवर हल्ला झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २५ एप्रिलला करवंद (ता. शिरपूर) येथील जमावाने खून प्रकरणासंदर्भात काढलेल्या आक्रोश मोर्चात शहर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली होती. त्यात चार पोलिस जखमी झाले होते. अश्रूधुराच्या दहा नळकांड्या फोडून जमाव पांगवणे भाग पडले होते. पाठोपाठ भाटपुरा येथेही पोलिसांवर हल्ला झाला. त्यामुळे पोलिसांचा वचक संपुष्टात आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.