म्हसदी : साक्री तालुक्यात ग्रामीण भागाला एकमेकांसाठी जोडलेल्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाने नेहमीच डंका मिरविणाऱ्या शासन यंत्रणेने केवळ डोळेझाक करत ग्रामीण भागातील समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा तीव्र रोष मनात ठेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दररोज सर्कस करत मार्गस्थ व्हावे लागते. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या... प्रचारादरम्यान भरमसाट आश्वासनेही दिली आहेत. आतातरी कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींसह वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. (damage of roads in rural areas Status in Sakri Taluka)
साक्री तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात दुसरा मोठा तालुका आहे. सुमारे अडीचशेपेक्षा अधिक गावे आणि पाडे आहेत. ग्रामीण भागाला एकमेकांसाठी प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता नादुरुस्त आहे. ‘ग्रामीण भागातील एखादा तरी गुळगुळीत रस्ता दाखवा आणि रोख रक्कम बक्षीस मिळवा’ अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
कासारे ते छाईल सहा किलोमीटर अंतरावर चारचाकीच काय दुचाकी चालविणे अवघड झाले आहे. दररोज खड्डे टाळण्यासाठी वाहनधारक गाडी विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आठवड्यात किमान दोन वेळा तरी दुचाकी घसरण्याच्या हमखास घटना घडतात.
साक्री येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा रस्ता मंजूर असल्याचे मिळमिळीत उत्तर दिले जाते. सात-आठ महिन्यांपासून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात आहे तो रस्ता अजून खराब होणार आहे. हीच अवस्था छाईल ते पिंपळनेर, छाईल ते प्रतापपूर, म्हसदी ते साक्री, म्हसदी ते काळगाव-राहूड, साक्री ते उभंड-वर्धाने, म्हसदी ते ककाणी-भडगाव, साक्री ते विटाई रस्त्याची आहे. (latest marathi news)
पाऊसाचे पाणी खड्ड्यांत
मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस झाल्यावर रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते. पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होतात. सर्वच वाहनांचे नुकसान होत शारीरिक दुखापत होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नादुरुस्त रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करत दिलासा द्यावा, नवीन मंजूर झालेला रस्ता होईल तेव्हा होईल, आज कोणाचा तरी जीव जाण्याची वाट प्रशासनाने पाहू नये. रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याची वेळ येऊ नये याचाही विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा.
कासारेसह सोळागाव काटवन परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दळणवळणाची साधने खराब होत आहेत. कारण रस्ता खराब असल्याचे सांगत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या वाहतुकीसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या सर्व प्रकारामुळे जनता पूर्ण मेटाकुटीला आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशीही तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. साक्री तालुक्यातील सर्वच रस्त्यांची डागडुजी करत वाहनधारकांना दिलासा द्यावा.
सध्याची परिस्थिती पाहता डागडुजी करत दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा वसमारचे माजी सरपंच गिरीश विश्वासराव नेरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रा. युवराज काकुस्ते, कासारे येथील माजी सरपंच रवींद्र देसले, माजी उपसरपंच बल्लदार पठाण, माजी उपसरपंच सचिन देसले, अरुण नरहर देसले यांच्यासह वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.
"ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पाचवीलाच पुजलेली आहे. एकीकडे विकास साधल्याचा बोलबाला असताना रस्त्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे ऐरणीवर आहे. नवीन रस्तेदुरुस्तीसाठी मंजूर असल्याचा केवळ देखावाच आहे. ग्रामीण भाग अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आज तोच कणा मोडकळीस आला आहे." - गिरीश नेरकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.