Devendra Fadanvis Dhule Daura : मोदींकडे सामान्य माणसासाठी संधी : देवेंद्र फडणवीस; शिरपूर सभेत अमरिशभाईंच्या कार्याची प्रशंसा
शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्यासाठी भारताचे संविधान पूज्यनीय आहे. आपल्याला संविधानामुळेच पंतप्रधान बनणे शक्य झाल्याचे ते नेहमी सांगतात. त्यांच्या कारकीर्दीत संविधान आणि आरक्षण यांना कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्यांच्याकडे सामान्य माणसांसाठी संधी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Dhule Devendra Fadnavis Daura news)
लोकसभा निवडणुकीमुळे येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (ता. ८) प्रचारसभा झाली. श्री. फडणवीस म्हणाले, की आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार, मुद्रा कर्ज योजनेत कर्जासाठी वाढीव २० लाखांची मर्यादा अशा तरतुदी केल्या आहेत.
धर्म, जात, पंथ असा कोणताही भेद न करता प्रत्येक गरजूला लाभ दिला आहे. धुळे जिल्ह्यात रेल्वेसह रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. काँग्रेसकडून संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार केला जातो. प्रत्यक्षात आणीबाणी लादून दोन वर्षे संविधान कोणी गुंडाळून ठेवले होते ते सर्वांना ठाऊक आहे. माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात झालेली शिरपूरची चौफेर प्रगती आदर्शवत असून, येथील विकासकामांसाठी आगामी काळात भरीव मदत केली जाणार आहे.
अमरिशभाईंच्या मागण्या
आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, की भाजपच्या काळात शिरपूरसाठी भरीव निधी आणणे शक्य झाले. तालुक्यातील पाच हजार वनदावेधारकांना सातबारा मिळावा, त्यांचे उतारे महसूलकडे वर्ग करावेत, अनेर प्रकल्पातून पूर्व भागासाठी कालवा तयार करण्याची योजना द्यावी, तालुक्यात एमआयडीसी तयार करून उद्योग द्यावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. (Latest Marathi News)
एक मेसेज, दोनशे कोटी
आमदार अमरिशभाई पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याचा उल्लेख करताना सांगितले, की तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी हवा म्हणून फडणवीस यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज टाकला होता. त्यांनी तातडीने दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्त्याला मंजुरी दिली.
शिरपूरमधील नियोजित एक हजार बेडचे हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्याला यावेच लागेल, अशी आग्रही विनंती पटेल यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली. आमदार काशीराम पावरा यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, लोकसभा निवडणूकप्रमुख डॉ. तुषार रंधे, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आदी उपस्थित होते.
ताफ्याला ‘काळे झेंडे’
दरम्यान, सभास्थळी येताना आणि जाताना येथील कोळी समाजातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळावे, अशी कोळी समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आंदोलक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.