Dhule Fake Fertilizer Case : येथील बनावट खतसाठा प्रकरणी कृषी सहसंचालकांनी खानदेशातील १९ कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीचा आदेश दिल्यानंतर असंख्य विक्रेत्यांमध्ये म्हणजेच कृषी सेवा केंद्रांमध्ये असंतोष पसरला.
प्रमुख होलसेलर डिस्ट्रिब्यूटर अर्थात, मोठे मासे गळाला लावण्याऐवजी कृषी सेवा केंद्रांची तपासणी कृषी अधिकारी पथकांनी सुरू केल्याने यामागचा उद्देश काय, असा प्रश्नही उपस्थित झाला.
ही धग लक्षात येताच कृषी पथकाने सोनगीर (ता. धुळे) येथील होलसेलर डिस्ट्रिब्यूटर लक्ष्मी ट्रेडर्सची शनिवारी (ता. २२) साडेसहानंतर तपासणी सुरू केली. ती रात्रीपर्यंत सुरू होती. (Dhule Fake Fertilizer Case Inspection of Songir Center by Agriculture Team news)
बनावट खतसाठा प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार सुरतच्या फार्म सन्स फर्टीकेम कंपनीकडून संशयित बनावट खत खरेदी झाले. नंतर फलटण तालुक्यातील ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम या कंपनीचा येथील मुख्य वितरक भूमी क्रॉप सायन्स कंपनीने खानदेशातील १९ कृषी सेवा केंद्रांना संशयित बनावट १८ः१८ः१० मिश्र खत पुरवठा केला.
त्यांची तपासणी व उल्लंघन आढळल्यास परवाना रद्द करण्याचे निर्देश कृषी सहसंचालकांनी दिले. यात धुळे, साक्री, शिरपूर तालुक्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. या निर्देशानंतर सहा ते सात कृषी अधिकाऱ्यांच्या पथकांनी शुक्रवारी तपासणी मोहीम सुरू केली. त्यात चार केंद्रांना विक्री बंद आदेश देताना ७५० खताच्या गोण्याही जप्त केल्या.
अनेक विक्रेत्यांत असंतोष
कृषी सहसंचालकांनी भूमी क्रॉप सायन्सच्या अभिलेख्यात आढळल्यानुसार १९ कृषी सेवा केंद्रांची यादी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे सोपविली. यात केवळ १९ केंद्रांची नावे का? प्रत्यक्षात दीडशेहून अधिक कृषी सेवा केंद्रांपर्यंत बनावट खतसाठ्याचा पुरवठा झाल्याने, यातही प्रमुख वितरकांऐवजी (होलसेलर डिस्ट्रिब्युटर) किरकोळ विक्रेत्यांची तपासणी सुरू केल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कृषी यंत्रणेपर्यंत धग
कृषी सेवा केंद्रांचे जाळे ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत विणले गेले आहे. ते शेतकऱ्यांना दारापर्यंत सेवा देतात. यात अनेक बेरोजगार, सातवी- दहावी उत्तीर्ण झालेल्यांनी उदरनिर्वाहासाठी खत वा कृषी निविष्टा विक्रीचा व्यवसाय पत्करला. तेव्हा होलसेलर डिस्ट्रीब्युटरकडून खताचा साठा घेताना त्यात बनावट खत आहे किंवा कसे हे कसे कळणार? शिवाय असे विक्रेते त्या भागाची गरज ओळखून साठा घेतात.
यात तो पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस वा काही अधिक प्रमाणात घेतला जातो. परंतु, होलसेलर डिस्ट्रीब्युटर हजारो टन खतसाठा नोंदवून ते इतर विक्रेत्यांना पुरवठा करतात. त्यामुळे होलसेलर डिस्ट्रीब्युटरची आधी तपासणी व्हावी, अशी मागणी असंख्य विक्रेत्यांकडून सुरू झाली.
त्याची धग कृषी यंत्रणेपर्यंत पोहोचल्याने त्यांनी शनिवारी सायंकाळनंतर सोनगीर येथील होलसेलर डिस्ट्रीब्युटर लक्ष्मी ट्रेडर्सकडे तपासणीचा मोर्चा वळविला. त्याचप्रमाणे शिरपूर आणि सोनगीरशी संलग्न धुळे शहरातील संबंधित होलसेलर डिस्ट्रीब्युटर्सची तपासणी केली जावी, अशी मागणी वर्तुळातून जोर धरते आहे.
नोंद नसेल, असे कसे शक्य?
बनावट खत प्रकरणी मुख्य वितरक येथील भूमी क्रॉप सायन्सच्या अभिलेख्यात जिल्ह्यातील अन्य प्रमुख वितरकांची (होलसेलर डिस्ट्रीब्युटर) नोंद नसेल, असे नसावे. कारण हजारो टन बनावट खतसाठा हा प्रमुख वितरकांशिवाय कृषी सेवा केंद्रांना पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे खानदेशातील १९ कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीचा आदेश होताना कृषी सहसंचालकांकडून प्रमुख वितरकांची नावे का समाविष्ट झाली नाही, असा प्रश्न जिल्ह्यातून उपस्थित करण्यात आला.
प्रमुख वितरक हा खतसाठा करत नसला तरी तो मुख्य वितरकाकडे अपेक्षित खतसाठ्याची नोंद करतो व त्याने दिलेल्या यादीनुसार मुख्य वितरक संबंधित कृषी सेवा केंद्रांना खतसाठ्याचा पुरवठा करत असतो. या व्यवहाराची नोंद मुख्य वितरकाकडे, प्रमुख वितरकांकडे नसेल यावर कुणी विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कृषी अधिकारी पथकाने प्रथम सोनगीरला तपासणीचा मोर्चा वळविल्याचे बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.