म्हसदी : अलीकडे बाजारात संकरित फळे मुबलक मिळू लागल्याने गावरान फळे दुर्मिळ होत चालली आहेत. पूर्वी ग्रामीण भागात मुबलक मिळणारा गावरान (गावठी) आंबा मिळेनासा झाला आहे. शेतशिवारात, नदीकाठी विशेषतः वाड-वडिलांनी लावलेली ‘आमराई’ दिसेनाशी झाली आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळाची झळ गावरान झाडांनाही बसल्याची माहिती जुने जाणकार देतात. (Dhule Gavran trees are also dying due to severe drought)
कारण ज्या वर्षी दुष्काळाचे सावट असते त्या वर्षाला गावरान आंबे, बोरे, सीताफळ तसेच वनक्षेत्रातील रानमेवा शोधून मिळत नाही. यासाठी १९७२ च्या दुष्काळाचा दाखला जाणकार देतात. आजी-आजोबांनी केलेले, नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आंबे मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने आमराई नष्ट होऊन गावरान आंबे चाखायला मिळणे दुरापास्त झाले आहे.
गावरानऐवजी संकरित आंब्याचा आमरस चाखावा लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागात ‘दादा लगाए आम और खाये पोता’ अशी म्हण प्रचलित होती. याचा अर्थ आजोबांनी लावलेल्या आंब्याची चव नातू हमखास चाखेल. पूर्वी बहुतेक गावांत आमराया अस्तित्वात होत्या. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर लागवड केलेली, तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची झाडे ताठ मानेने उभी होती.
मात्र अलीकडील काळात काही झाडे जुनी होऊन वाळून जात आहेत, तर नवीन संकरित, कलम केलेल्या विविध जातींच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मिळ झाले. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याची झाडे दृष्टीस पडत असल्याचे चित्र आहे.
शेंद्र्या, शेप्या, गोटी, दश्या, फणस्या, नाक्या आदी नावाने ओळखली जाणारी गावरान आंब्याची झाडे व आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वी खेड्यात एकमेकांच्या घरी आंबे भेट (वानोळा) देण्याची पद्धत होती. खेड्यातही ती अलीकडे राहिलेली दिसत नाही. (latest marathi news)
फळांचा राजा (गावरान) दुर्मिळच
फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली आहे. पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढ्यांचा सुगंध जिभेस पाणी आणत असे. आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहुणचाराचा खास मेन्यू असायचा.
मात्र, हे सर्व कालबाह्य झाले आहे. दुसरीकडे बाजारात अनेक प्रकारचे संकरित आंबे मिळत असल्याने ‘दुधाची तहान ताकावर भागवली’ जात आहे. सध्या दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्यांची हौस भागवावी लागत आहे. शिवाय यंदा वाढते तापमान व वातावरणातील बदलाचा फटका आंब्यांना बसला आहे.
गावरान आंबे दुर्मिळ झाले असून, क्वचित ठिकाणी गावरान झाड कैऱ्यांनी बहरल्याचे चित्र आहे. मध्यंतरी अवकाळीचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी आंबे गळून नुकसान झाले आहे. नवीन संकरित आंबे कृत्रिम रीतीने पिकविलेले खाऊन हौस भागवावी लागणार आहे. सर्वांना आवडणारे नैसर्गिक रीतीने घरी पिकवलेले गावरान आंब्याची चव चाखायला मिळणे अवघड झाल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.