Dhule News : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमासाठी यंदा ४६९ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी ४७ कोटींचा अधिकचा निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी प्राप्त झाला आहे. (Guardian Minister Mahajan statement Development works in district with fund of 469 crore)
तो खर्ची पडण्यासाठी योग्य त्या पूर्तता करून कामे मार्गी लावावीत, अशी सूचना पालकमंत्री गिरीश महाजन तथा ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्र्यांनी जिल्हा सरकारी यंत्रणेला दिली.जिल्हा नियोजन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (ता. २९) बैठक झाली. पालकमंत्री महाजन अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी.
आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारूक शाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे,
जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच रस्ते, सिंचन, वीज व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन विकासकामे प्रभावीपणे मार्गी लावावीत, असे निर्देश अधिकारी वर्गाला दिले. (latest marathi news)
त्यांनी दिलेल्या विविध सूचना अशा ः जिल्ह्यास विविध विकासकामांसाठी या वर्षी प्राप्त निधीतून रस्ते, सिंचन, वीज तसेच अन्य विभागाच्या योजनांमधील कामांना तांत्रिक मान्यता घ्यावी. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत आणि पंधरा ते वीस दिवसांत कामे सुरू करावीत. वीज वितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यात नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.
पाणीप्रश्नी प्रस्ताव द्यावा
राज्य शासनाने कृषिपंपधारकांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा, तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौर कृषिपंपाचे वाटप करावे. नवीन विहिरीचे कामे पूर्ण झाले अशा ठिकाणी जलदगतीने नवीन जोडणी द्यावी. वलवाडी शिवारात नकाणे तलावातून वाहून येणारे पाणी निचरा करण्यासाठीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा. महापालिकेत समावेश झालेली ११ हद्दवाढ गावातील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदीप या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. धुळे शहरास रोज पाणीपुरवठा तसेच सिंचनासाठी अक्कलपाडा धरणाची जलक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
दर्जेदार रस्ते करावेत
शिंदखेडा व दोंडाईचा पालिकांच्या प्रलंबित विविध विकासकामांना त्वरित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जेदार रस्ते तयार करावेत. पोलिस विभागाने जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले.
विविध योजनांचा आढावा
पालकमंत्री महाजन म्हणाले, की राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना.
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आदींचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना लाभ द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. खासदार, आमदार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत येणाऱ्या अडचणी अध्यक्षांसमोर मांडल्या. जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृती आराखडा निश्चित करणार
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा वार्षिक योजनेत २०२३-२०२४ या वर्षात प्राप्त झालेला निधी व खर्चाची माहिती दिली. तसेच २०२४-२०२५ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेमधील मंजूर नियतव्ययापैकी किमान २५ टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यासाठी निश्चित केला आहे. याअंतर्गत जिल्हा वार्षिक कृती आराखडा निश्चित केल्यानुसार विविध विभागांमार्फत नावीन्यपूर्ण कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.